मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या इवल्याशा स्वरासोबत भारमल दाम्पत्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोल्हापुरातल्या भारमल कुटुंबात दोन महिन्यांपूर्वी इवल्या-इवल्या पावलांनी स्वराचा प्रवेश झाला. तिच्या आगमनाने भारमल दाम्पत्य हर्षोल्हासात न्हाले. पण हा उल्हास अल्पजीवी ठरला. पंधरा दिवसातच स्वराच्या डोळ्यांसमोर अंध:काराचे ढग दाटू लागले. सांगलीत लायन्स रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या डोळ्यांवर जोखमीची शस्त्रक्रिया करून हे मळभ दूर केले. त्यामुळे स्वराच्या आयुष्यात पुन्हा रंगीबेरंगी फुलपाखरे बागडू लागली.
कोल्हापुरातील किराणा व्यावसायिक भारमल कुटुंबाची ही कहाणी. इवल्याशा स्वराची बुबुळे एका जागी स्थिर राहत नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. रुग्णालयात तपासणीअंती स्वराच्या दोन्ही डोळ्यांत जन्मत:च मोतिबिंदू असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भारमल दाम्पत्य हादरले. कोल्हापुरातच काही ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न केले, पण खर्च आवाक्याबाहेरचा होता.
सांगलीत घन:श्यामनगरमधील लायन्स क्लबच्या श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन नेत्र रुग्णालयाचा संदर्भ त्यांना मिळाला. डॉ. स्वप्नाली बंडगर, चिदानंद हलपन्नावर, डॉ. बी. एन. पाटील व सहकाऱ्यांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रियेची हमी दिली अन् नुकतीच ती झाली देखील. पहिल्यांदा एका डोळ्याची व पंधरवड्यानंतर दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. दोन्ही डोळ्यांतील मोतिबंदू काढून टाकले.
डॉ. बंडगर, हलपन्नावर यांनी सांगितले की, इतक्या अल्प वयातील अर्भकावर रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया झाली. यापूर्वीची अर्भके आठ ते दहा महिन्यांची होती. पण स्वराच्याही डोळ्यांत रंग भरण्यात आम्ही यशस्वी झालो.
चौकट
बुबुळांची चंचलता, मोतिबिंदूची निश्चितता
अर्भकाचे डोळे प्रकाश किंवा हालचालींना पटकन प्रतिसाद देतात. पण स्वराची नजर तशी नसल्याचे आईच्या लक्षात आले. आता शस्त्रक्रियेनंतर स्वराचे डोळे प्रकाश किंवा हालचालींना त्वरित प्रतिसाद देऊ लागले आहेत.
चौकट
जनुकीय दोषाची शक्यता
प्रशासकीय अधिकारी राधिका सूर्यवंशी यांनी सांगितले की, दहा टक्के बाळांमध्ये जन्मत:च मोतिबिंदूची शक्यता असते. जनुकीय दोष किंवा वंशपरंपरेने हा विकार होतो. स्वराच्या आईलादेखील हा विकार आहे, पण लहानपणी तिच्या डोळ्यांतील मोतिबिंदूवर योग्य उपचार मिळाले नसावेत. तिच्या माध्यमातूनच स्वरालाही मोतिबिंदू झाला असण्याची शक्यता आहे.
---------------