मिरज : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे ६ जूनपासून बिकानेर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू होत आहे. ही रेल्वे पुढे मिरज-पुणे विशेष म्हणून धावणार आहे. एकाच गाडीचे दोन तुकडे करण्यात आल्याने मिरजेतून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या मनमानीमुळे संताप व्यक्त होत आहे.नवीन पुणे-बिकानेर पुणे साप्ताहिक एक्स्प्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार करण्यात आला आहे; परंतु मध्य रेल्वेने बिकानेर ते पुणे व पुणे ते मिरज परतीच्या प्रवासासाठी मिरज ते पुणे व पुणे ते बिकानेर अशी दोन तुकड्यांत या एक्स्प्रेसची विभागणी केली आहे. ही एक्स्प्रेस मिरज-बिकानेर अशी सोडल्यास या गाडीचे उत्पन्न मिरजेला मिळाल्याने पुणे स्थानकाचे महत्त्व कमी होईल. यासाठी तिची विभागणी करण्यात आल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून गुजरात व बिकानेरला जाणाऱ्या प्रवाशांना विचारात घेतलेले नाही.मध्य रेल्वेची मिरज-पुणे-मिरज अशी प्रत्येक मंगळवारी साप्ताहिक स्पेशल एक्स्प्रेस सुरू होत आहे. ही एक्स्प्रेस पुणे येथून सकाळी आठ वाजता निघून व मिरजेत दुपारी १:४५ वाजता पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी २:२५ मिनिटांनी मिरजेतून पुण्याला जाईल. सायंकाळी ७:४० वाजता पुणे स्थानकात पोहोचणार आहे.मिरज ते पुणे या २८० किलोमीटरसाठी एसी थ्री टायर ११०० रुपये दर आहे. तोच दर १३५६ किलोमीटरच्या पुणे ते बिकानेर प्रवासासाठी १६१० रुपये आकारला जाईल. विशेष दर्जामुळे स्लीपर व सर्वसाधारण तिकिटासाठीही जादा पैसे द्यावे लागणार आहेत. ही गाडी मिरज-पुणे-मिरज स्पेशल न सोडता मिरज-बिकानेर एक्स्प्रेस म्हणून सोडावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी केली.
दोन आरक्षित तिकिटे घ्यावी लागणारबिकानेर-पुणे एक्स्प्रेस पुणे स्थानकात आल्यानंतर अर्ध्या तासातच मिरजेला रवाना होणार आहे. मात्र या रेल्वेचे बिकानेर ते मिरज असे तिकीट मिळणार नाही. एकाच गाडीला प्रवासाच्या दोन टप्प्यांत वेगळे क्रमांक देण्यात आले आहेत. यामुळे एखाद्यास मिरजेतून बिकानेरला जायचे असल्यास मिरज-पुणे व पुणे बिकानेर अशी दोन आरक्षित तिकिटे घ्यावी लागणार आहेत. दोन्ही टप्प्यांचे दरही वेगवेगळे असणार आहेत.