सांगली : विश्वासार्ह बातम्या आणि विविधांगी मजकुराच्या बळावर वाचनसंस्कृती रुजविणाऱ्या ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा २२वा वर्धापन दिन विशेषांक सोमवारी (दि. ८) प्रसिद्ध झाला. कोरोना काळात विविध क्षेत्रांतील सांगलीकरांनी दाखविलेल्या धैर्याचा आणि जिद्दीचा सकारात्मक मागोवा घेणाऱ्या ‘नवी आशा, नवी दिशा’ विशेषांकाचे जिल्हाभरात उत्स्फूर्त स्वागत झाले.
गेली २२ वर्षे ‘लोकमत’च्या पाठीशी राहिलेल्या असंख्य वाचकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावर्षी कोरोनामुळे जाहीर कार्यक्रम करू नयेत, या प्रशासनाच्या सूचनेचा आदर राखत ‘लोकमत’ने वर्धापन दिनाचा स्नेहमेळावा रद्द केला. कोरोनाच्या नियमावलीचे भान राखत विशेषांकाचे प्रकाशन केले. सांगलीकरांचे आराध्यदैवत असणाऱ्या गणपती मंदिरासमोर सकाळी ‘लोकमत’च्या वाचकांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. दुपारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी विशेषांकाचे भरभरून कौतुक केले. विशेषांकासाठी निवडलेला विषय, त्यात लेखनाद्वारे योगदान देणारे विविध क्षेत्रांतील दिग्गज व अभ्यासू लेखक यामुळे विशेषांक वाचनीय झाल्याचे ते म्हणाले. विविध संकटप्रसंगी तसेच विकासाच्या प्रश्नांवर ‘लोकमत’ने जिल्हा प्रशासनाला नेहमीच दिशादर्शी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. विशेषांकाच्या माध्यमातूनही ‘लोकमत’ने बळ दिल्याचे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक गेडाम यांनीही ‘लोकमत’च्या समाजाभिमुख भूमिकेचे कौतुक केले. ‘लोकमत’ने नेहमीच विधायक बाबींना पाठबळ दिल्याचे गैारवोद्गार त्यांनी काढले. यावेळी सिनर्जी रुग्णालयाचे सीईओ प्रसाद जगताप, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, जाहिरात व्यवस्थापक विनायक पाटील उपस्थित होते.
जिल्हाभरातूनही असंख्य वाचकांनी विशेषांकाचे कौतुक केले. कोरोनाच्या कालखंडात ‘लोकमत’ने नवी आशा जागवत नवी दिशा दाखविल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.