सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, सोमवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी केवळ ०.७ मिलिमीटर पाऊस झाला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सांगली शहर व परिसरात सोमवारी सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. दुसरीकडे धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही कमी झाला आहे. धरणातील विसर्ग सुरु असला तरी त्याचा नदीपातळीवरील परिणाम कमी आहे. सोमवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी १४.१ इतकी होती. चोवीस तासात पाणीपातळीत ६ फुटांनी घट झाली आहे. येत्या दोन दिवसात ती आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २५ जूनपर्यंत पावसाचा जोर कमीच राहणार आहेत. काही ठिकाणी तुरळक सरी, शिडकावा होण्याची शक्यता आहे. या काळात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. काही ठिकाणी पूर्ण उघडीप मिळण्याची शक्यता आहे.
चौकट
दुष्काळी भागात शिडकावा
जिल्ह्याच्या दुष्काळी भागातही यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. गेल्या दोन दिवसात येथील जोर पुन्हा ओसरला आहे. जत, खानापूर-विटा, कवठेमहांकाळ व आटपाडीत केवळ काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.
चौकट
तापमानात पुन्हा वाढ
जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग चार दिवस पडलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली होती. आता तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी कमाल तापमान ३१ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानात आणखी दोन अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे.