सांगली - राज्यातील इयत्ता 10 वीचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यानंतर, अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून आले. पालक, विद्यार्थी तसेच शिक्षक एकमेकांचे अभिनंदनही करताना दिसत आहेत. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला. त्यात, कित्येकांनी परिस्थितीशी दोनहात करत यश मिळवले आहे. कुणी काम करुन स्वत:चं शिक्षण पूर्ण केलंय. तर, कुण्या रिक्षावाल्याच्या पोरानं 90 टक्क्यांची भरारी घेतलीय. काहींनी वयाचं बंधन न झुगारत 10 वीची परीक्षा पास केलीय. सांगलीतील एका मेंढपाळपुत्रानेही असंच यश कमावलंय.
राज्यात कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली. तर, पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे. सगळीकडे ८०-९० टक्क्यांची चर्चा होत असताना पुण्यातील एका पट्ठ्याने सर्वच विषयात ३५ गुण मिळवले आहेत. तर, वडिल हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात तर आई घरकाम करते. अशा परिस्थितीतून धायरीतील पायलकुमारीने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे सांगलीत एका मेंढपाळाच्या मुलाने मेंढ्या चारुन अभ्यास करत ९२ टक्के गुण मिळवले.
शाळेसाठी शेंडगेवाडी ते कामथ रोजचा ५ किमीचा खडकांनी भरलेला प्रवास. त्यानंतर मेंढ्या चारण्यात बापाला मदत करायची, अभ्यास करायचा. अशा संघर्षातून हेमंत बीरा मुढे या मेंढपाळ पुत्रानं दहावीला ९२ टक्के मिळवले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुलाचं ट्विट करुन कौतुक केलंय. तसेच, ''तुझ्या कपाळी भंडारा राहू दे, बा बिरोबाचं बळ तुझ्या आयुष्यात नक्की सोबत राहिल.'', असेही पडळकर यांनी या यशस्वी विद्यार्थ्याबाबत म्हटलं आहे.
दरम्यान, दहावीच्या निकालात अनेक गरीब आणि आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियातूनही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.