सांगली : राज्य शासनाने महिलांना एस. टी. भाड्यात ५० टक्के सवलत दिल्याने खासगी प्रवासी वाहतुकीचे (वडाप) अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने आवश्यक फेऱ्याही होत नसल्याने वाहनचालकांनी राज्य शासनाविरोधात आंदोलन सुरू केले असून, सर्व वाहनांवर काळे झेंडे लावण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येणार आहे.राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमधून प्रवासासाठी महिलांना ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे एस.टी.मधील महिला प्रवाशांची संख्या वाढली असली तरी खासगी प्रवासी वाहतुकीचे कंबरडे मोडले. शासनाने हा निर्णय घेताना आमचाही विचार करायला हवा होता, असे चालकांचे म्हणणे आहे.जिल्हा टॅक्सी-मॅक्सी कॅब पंचायतचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मजगे यांनी सांगितले की, शासनाने पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सवलती दिल्या आहेत. एस.टी.बरोबरच आता आम्हालाही अनुदान द्यावे. वाहनचालक व मालकांनी कर्जे काढून वाहने घेतली आहेत. आता प्रवासी कमी झाल्याने आर्थिक अडचण जाणवत आहे. त्यामुळे आता शासनाने ही वाहने जमा करून घेऊन आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. प्रवासी मिळत नसल्याने दिवसभरात एखादीच फेरी होत आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.आता तीन दिवस जिल्हाभरातील सर्व खासगी प्रवासी वाहनचालक काळे झेंडे लावून प्रवासी वाहतूक करणार आहेत. तीन एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे अंकुश खरात, शिवाजी घुगरे, संतोष मोटे, उदय घोरपडे, दाजी गडदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
एस.टी. सवलतीच्या निषेधार्थ सांगलीत वडाप वाहनचालकांनी केला राज्य शासनाचा निषेध, वाहनांवर लावले काळे झेंडे
By शरद जाधव | Published: March 22, 2023 6:21 PM