- जालिंदर शिंदेघाटनांद्रे - सामान्यांचा आधारवड असलेल्या एसटीचा भोंगळ कारभार वारंवार समोर येतोच. नादुरुस्त गाड्यांमधील प्रवासाचा अनुभव प्रवाशांना अनेकदा येतो. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमध्येही गुरुवारी असाच अनोखा अनुभव प्रवाशांना आला. ॲक्सिलेटर खराब झालेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून निष्णात वाहकाने जुगाड केला. स्वत:च्या हाती स्टेअरिंग व दोरी बांधलेला ॲक्सिलेटर महिला वाहकाच्या हाती देऊन प्रवाशांना चाळीस किलोमीटरचा सुरक्षित प्रवास घडविला.
कवठेमहांकाळ एसटी आगाराचा सावळागोंधळ संपता संपेना. अधिकारी बदलले, पण येथील समस्या कायम आहेत. गाड्या वेळेवर लागत नाहीत आणि लागल्याच तर त्याला चालक, वाहक वेळेवर मिळत नाहीत. गाड्यांचे वेळापत्रक नेहमीच विस्कळीत झालेले असते. त्यातच आगारात नादुरुस्त गाड्यांचा मोठा भरणा आहे. ढकलस्टार्ट गाड्यांवर बेभरवशाचा प्रवास सुरु आहे. बसेस कधी बंद पडतील, हे कोणालाही सांगता येत नाही.
गुरुवारी २५ मे रोजी सायंकाळी एक अनोखा प्रवास तालुक्यात घडून आला. सायंकाळी पावणेसहा वाजता निघालेल्या कवठेमहांकाळ-घाटनांद्रे बसमधील ऑक्सिलेटर कुची-जाखापूरदरम्यान अचानक निसटला. बसच्या प्रवाशांची चिंता वाढली. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसचालक एम. ए. पाटील यांनी चांगला जुगाड केला. नादुरुस्त ॲक्सिलेटर दोरीने बांधून ती दोरी महिला वाहक पी. व्ही. देसाई यांच्या हाती दिली. त्यांना ती ॲक्सिलेटरची दोरी योग्यवेळी कमी-जास्त ओढण्यास सांगितली. त्यांच्या मदतीने जाता-येता ४० किलोमीटर अंतर पार करत बस सुरक्षित नेऊन प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला.
प्रवाशांकडून वाहक-चालकाचे कौतुकसायंकाळी प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून वाहक व चालकाने केलेली कसरत प्रवाशांच्या कौतुकाचा विषय ठरली. बसमधून उतरताना सर्वांनी दोघांनाही धन्यवाद दिले. कर्मचारी प्रवाशांसाठी जीवतोड मेहनत घेत असताना महामंडळामार्फत चांगल्या बस का दिल्या जात नाहीत, असा सवाल काही प्रवाशांनी उपस्थित केला.