सांगली : कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून शिथिलता दिली आहे. यानंतर एसटी, रेल्वे सुरू झाली आहे. सर्वसामान्यांचा अधार असलेल्या एसटीला प्रवाशांची मोठी गर्दी असून, त्यांची सेवा पूर्वपदावर आली आहे. रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू असून, पॅसेंजर सुरू नसल्यामुळे रेल्वेकडे प्रवासी फिरकलेच नाहीत. यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे मोकळ्याच धावत असल्याचे दिसत आहे.
एसटी महामंडळाने मंगळवारपासून पूर्ण क्षमतेन प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात बसेसच्या १२५ फेऱ्या झाल्या असून, १६ हजार १३५ प्रवाशांनी प्रवास केला आहे. सांगली, मिरजेतून सातारा, पुणे मार्गावरही आठ बसेस धावल्या आहेत. सांगली ते कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावर तासाला एक बस धावत आहे. प्रत्येक बसमध्ये ५० टक्क्यांहून जास्त प्रवासी आहेत. येत्या आठवडाभरात एसटीची बस सेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. रेल्वेकडील प्रवासी संख्या लक्षात घेऊनच पॅसेंजरसह अन्य रेल्वे गाड्या सोडण्याचे रेल्वे प्रशासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासन प्रवासी संख्येचा अंदाज घेत आहे. कोरोनाची भीती लोकांच्या मनामध्ये कायम असल्यामुळे रेल्वेकडे प्रवासी संख्या कमी असल्याचे दिसत आहे.
कोट
प्रवाशांच्या मनात कोरोनाबद्दल भीती असल्यामुळे लोकलला गर्दी कमी आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेला सध्या प्रवासी संख्या वाढत आहे. येत्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्रवाशांची गर्दी पाहूनच रेल्वेच्या गाड्याही जादा सुटतील.
-मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे.
कोट
मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे एसटीकडे प्रवाशांची चांगली संख्या आहे. जत, कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे, सातारा मार्गावर प्रवासी जास्त असल्यामुळे बसेस फुल जात आहेत. येत्या आठवडाभरात एसटीच्या सर्व मार्गावरील फेऱ्या सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.
-अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, सांगली.
कोट
एसटी प्रशासनाकडून बसेसची स्वच्छता राखली जात आहे. यामुळे प्रवास करतांना कोरोनाची भीती वाटत नसून एसटीचा प्रवास सुखाचा वाटत आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर केला जात आहे.
-राहुल पाटील, प्रवासी एसटी.
कोट
एसटीने प्रवास करणे सुरक्षित वाटत आहे. तसेच सुरक्षित अंतर ठेवून अन्य कुठल्याही वाहनातून प्रवास करणे शक्य नाही, केवळ एस. टी.तूनच प्रवास करता येऊ शकतो. यामुळे आमचा प्रवास एसटीतूनच सुरू आहे.
-सविता जाधव, प्रवासी एसटी.
कोट
मी शासकीय नोकरीत असल्यामुळे मिरज ते कोल्हापूर नेहमी रेल्वेनेच प्रवास होत होता. पण, सध्या कोरोनाची भीती असल्यामुळे दीड वर्षापासून रेल्वेचा प्रवास बंद केला आहे. कधी एसटीने, तर कधी स्वत:च्या गाडीने प्रवास करीत आहे.
-प्रल्हाद कुलकर्णी, रेल्वे प्रवासी.
कोट
रेल्वेचा प्रवास खरच चांगला आहे. गर्दी नाही आणि सुरक्षितही प्रवास आहे. पण, पुरेशा रेल्वे सध्या सुरू नसल्यामुळे खासगी वाहनांचा प्रवासासाठी वापर करीत आहे. येत्या पंधरा दिवसात पुन्हा रेल्वेने प्रवास सुरू होईल.
-सुशांत पाटील, रेल्वे प्रवासी.
चौकट
-जिल्ह्यात रोज बसेसच्या फेऱ्या : १२५
-रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या : १६,१३५
-धावणाऱ्या रेल्वेची संख्या : ११
-रेल्वे प्रवासी संख्या : २०००
चौकट
रेल्वेला दक्षिणेला गर्दी
कोरोनाच्या भीतीमुळे रेल्वेला प्रवाशांची संख्या अत्यंत कमी आहे. सोमवारपासून लॉकडाऊनमधील अनेक नियमांमध्ये शिथिलता आहे. तरीही सांगली, मिरज रेल्वे स्थानकांवर स्थानिक प्रवाशांची गर्दी कमी आहे. पण, दक्षिणेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. येत्या आठवड्यात रेल्वेकडे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पॅसेंजरही सुरू होण्याची शक्यता रेल्व प्रशासनाने वर्तविली आहे.
चौकट
जत, पुणे मार्गावर गर्दी
दोन महिन्यांनंतर एसटीचा प्रवास सुरू झाला आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्य प्रवाशांना एसटी हाच प्रवासासाठी मोठा आधार आहे. यामुळे सोमवारपासून एसटीने प्रवासी वाहतुक सुरू करताच प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सांगली ते जत आणि सांगली ते पुणे मार्गावर प्रवाशांची चांगली गर्दी असल्याची माहिती एसटी महामंडळाचे सांगली विभागाचे विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.