सांगली : जिल्ह्यातील ४००४ एसटी कर्मचाऱ्यांपैकी शिस्तभंग नोटीस, बडतर्फ, निलंबितासह १८०० कर्मचारी आजही संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी दि. १० मार्चपर्यंत कामावर हजर राहावे, कारवाई मागे घेण्यात येईल. पण, १० मार्चनंतर मात्र कामावर आला तर तुम्ही कायमचे नोकरीला मुकाल, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी एसटीचे राज्यशासनामध्ये विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन कामावर हजर व्हावे, निलंबनासह अन्य कारवाई मागे घेऊ असे आवाहन केले होते. त्यानुसार सांगलीत एसटी महामंडळाने प्रत्येक आगार प्रमुखांद्वारे कर्मचाऱ्यांना दि. १० मार्चपर्यंत कामावर येण्याचे आव्हान केले आहे. या कालावधीत कामावर हजर झाला तर कायदेशीर पूर्तता करुन कारवाई मागे घेण्यात येईल. पण, जर दि. १० मार्चनंतर उपस्थित राहिल्यास त्यांच्यावरील कारवाई मागे घेता येणार नाही. निलंबीत, बडतर्फ कर्मचाऱ्यांना वाचविणे कठीण आहे, असेही एसटी प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांनी तीन महिन्याच्या मुदतीत अर्ज केला असेल तर कायदेशीर पूर्तता करुन त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येणार आहे. तीन महिन्यात अर्ज केला नाही तर त्यांना १५ दिवसाची मुदत वाढ द्यावी, अशा सूचना एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.
काय म्हणते आकडेवारी
-सांगली जिल्ह्यातील कर्मचारी : ४००४-निलंबित कर्मचारी : ८२३
-सेवासमाप्ती कर्मचाऱ्यांची : ११६-बदली केलेल्या कर्मचाऱ्यांची : ११७
- बडतर्फ कर्मचारी : ६५८-बडतर्फ, निलंबितासह आजची संपातील कर्मचारी : १८००
कारवाई झालेल्यांसह सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, त्यानंतर कारवाई मागे घेण्यात येईल. सध्या यात्रा चालू झाल्यामुळे एसटीकडे प्रवाशांची गर्दी आहे. तोट्यातून बाहेर पडण्याची हीच मोठी संधी असल्यामुळे एसटी आणि आपल्या हितासाठी तत्काळ कामावर हजर व्हावे.
-सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, सांगली विभाग.
कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे : अशोक खोत
एसटी वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, त्यानंतर मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत राहूया. कारवाईही मागे घेण्याबरोबरच थकीत वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ही शासनाशी चर्चा करण्यात येईल. पण, कर्मचाऱ्यांनी आता वेळ न घालविता, तत्काळ कामावर येण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी केले आहे.