सांगली : एसटी कामगारांचे नेते रावसाहेब माणकापुरे (वय ७७) यांचे दीर्घ आजाराने आज, गुरुवारी (दि. २०) पहाटे निधन झाले. सकाळी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार व दुपारी रक्षाविसर्जन झाले. माणकापुरे यांच्या निधनाने हजारो एसटी कामगारांचा आधार हरपला आहे.माणकापुरे यांनी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) चे केंद्रीय उपाध्यक्ष, सांगली विभागीय उपाध्यक्ष, इंटकचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून आक्रमकपणे काम केले होते. एसटी सहकारी बॅंकेचे संचालक म्हणून तीनवेळा निवडून आले होते. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. गोविंदराव आदीक व जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली.विविध आरोपांखाली एसटीने कारवाया केलेल्या राज्यभरातील साडेतीन हजाराून अधिक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. निलंबित, बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना अन्नाला लावले. त्यांच्यासाठी न्यायालयात अखंड लढाया लढल्या.माणकापुरे अण्णा या नावाचा राज्यभरातील एसटी प्रशासनात दबदबा होता. कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढतानाच एसटीच्या हिताची तळमळही कायम ठेवली. संघर्षाच्या स्थितीत सन्मान्य तोडगे काढण्यात अनेकदा यशस्वी ठरले. १९७१ पासून एसटीच्या सांगली विभागीय कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक म्हणून सेवा केली.गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील उमेश माणकापुरे यांचे ते वडील होत.
एसटी कामगारांचे नेते रावसाहेब माणकापुरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 4:16 PM