सांगली : न्यायालयाच्या आदेशानंतर संपातील एसटी कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. मंगळवारी १०७ कामगारांनी पुन्हा एसटीचे स्टेअरिंग हाती घेतले. आतापर्यंत ३२५ कर्मचारी यावेळी गुलाबपुष्प देऊन या कर्मचाऱ्यांचे सांगली आगारात स्वागत करण्यात आले. तब्बल पाच महिन्यांनंतर कामावर परतलेल्या महिला वाहक बसला बिलगून भावूक झाल्या होत्या.
एसटी कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत विलगीकरणासाठी नोव्हेंबरपासून संप पुकारला होता. या संपाच्या सुरुवातीला सांगली जिल्ह्यातील बहुतांश कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. शासनाने पगारवाढीसह काही मागण्या मान्य केल्यानंतर हजार ते दीड हजार कर्मचारी कामावर परतले. तरीही निम्म्याहून अधिक कर्मचारी संपावर असल्याने एसटीची सेवा सुरळीत झाली नव्हती. अखेर न्यायालयानेच संप बेकायदेशीर ठरवीत २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले.
त्यानंतर संपातील कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. सोमवारपर्यंत दोनशेहून अधिक कर्मचारी रुजू झाले होते. मंगळवारी आणखी १०७ कर्मचारी कामावर आले. अजून २९४ कर्मचारी हजर झालेले नाहीत. येत्या दोन दिवसांत तेही हजर होतील, असा विश्वास महामंडळाला आहे. सांगली आगारात या कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिला वाहक भावूक झाल्या होत्या. काही महिलांनी एसटीला बिलगून अश्रूंना मोकळी वाट करून दिली. कामावर परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, एसटी कामगार नेते विजय चौगुले, महेश शेळके, मीनाताई जाधव, सविता माळी, अरुण डिसले, सदानंद मदने, सुरेश माने आदी उपस्थित होते.
बडतर्फ कर्मचाऱ्यांची सुनावणीसंपात सहभागी झालेल्या ८९० कर्मचाऱ्यांना महामंडळाने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनाही पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. त्याआधी बडतर्फीवर सुनावणी होईल. सुनावणीनंतरच त्यांना हजर करून घ्यायचे की नाही, याचा निर्णय होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.