सांगली : मुंबईत बेस्ट उपक्रमासाठी जिल्ह्यातून कर्मचारी पाठविण्यास एसटी कामगार संघटनेने तीव्र विरोध केला आहे. प्रशासनाने तशी सक्ती केल्यास ११ मे पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
संघटेनेतर्फे जिल्हाधिकारी व एसटी प्रशासनाला मंगळवारी निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुंबईला बेस्ट उपक्रमासाठी कर्मचारी पाठविण्याची तयारी सध्या सुरू आहे, पण याला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. मार्च २०२० पासून वेळोवेळी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून मुंबईत काम केले आहे. त्यामुळे १७२ कर्मचारी व ३२ कुटुंबीय कोरोनाबाधित झाले. त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. या स्थितीत पुन्हा कर्मचारी पाठविण्याचा आदेश आल्याने संताप व्यक्त होत आहे.
मुंबईत अत्यंत असुरक्षित वातावरणात काम करावे लागते. एसटी गाड्या स्वच्छ केल्या जात नाहीत. देखभालही होत नाही. विश्रांतीची, जेवणाची आबाळ होते. या स्थितीत तेथे काम करणे शक्य नाही. तरीही कर्मचारी पाठविण्याचा प्रयत्न झाल्यास ११ मेपासून उपोषण केले जाईल.