सांगली : मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या १० हजार २५२ कर्मचाऱ्यांचे व पोलिसांचे मतदान उद्या (बुधवार) होत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्राच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचेही मतदान होत आहे. आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांचे उद्या प्रशिक्षण होत असून, प्रशिक्षण झाल्यानंतर मतदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये त्या-त्या मुख्यालयाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे. उद्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आहे. सकाळी दहापासून सायंकाळपर्यंत हे प्रशिक्षण होत आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण १० हजार २५२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना मतपत्रिका देण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांचे मतदान घेऊन मतपेटी सील करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत नाव असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही दुसऱ्या मतदारसंघात करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान सुरूच राहणार आहे.जे कर्मचारी उद्या मतदान करणार नाहीत, त्यांचे मतदान पुन्हा १४ आॅक्टोबररोजी घेण्यात येईल. त्यावेळीही त्यांनी मतदान केले नाही, तर त्यांना टपाली मतदान करण्याचा अधिकार आहे. हे टपाली मतदान मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली आहे. (प्रतिनिधी)पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान मतदान करणार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये २ हजार ३२८ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचे मतदान, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणीच घेण्यात येणार आहे. जे कर्मचारी मतदान करणार नाहीत, त्यांना टपाली मतदान करण्याची सोय करण्यात आली आहे.
कर्मचारी, पोलिसांचे आज मतदान
By admin | Published: October 07, 2014 10:51 PM