सांगली : राज्यातील माध्यमिक आणि खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांकडून शासनाकडे वारंवार केली होती. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची पवित्र पोर्टलव्दारे प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत रावसाहेब पाटील बोलत होते. बैठकीस शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी प्रा. एन. डी. बिरनाळे, कोल्हापूर विभागीय संघटक विनोद पाटोळे, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष महावीर सौंदत्ते, आटपाडी तालुका शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष अजित चव्हाण, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे प्रा. एच. यू. पवार आदी उपस्थित होते.रावसाहेब पाटील म्हणाले की, शाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त राहिल्याने शिक्षकांवर अध्यापनाचा प्रचंड भार येत होता. मुख्याध्यापकांचीही मोठी अडचण झाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. म्हणूनच शासनाकडे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न केले होते. शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या या लढ्याला यश आले आहे.
खुशखबर! राज्यातील रखडलेली शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार, शिक्षण संस्थाचालकांच्या लढ्याला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 5:58 PM