सांगली : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. युती व आघाडी ऐनवेळी तुटल्याने उमेदवारांच्या वातावरण निर्मितीसाठी सर्वच राजकीय पक्षांना स्टार प्रचारकांची गरज भासू लागली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक स्टार प्रचारक निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा माहोल गरम होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी व शिवसेना-भाजपची युती होणार, असे गृहित धरून जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राजकीय समीकरणे आखली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे माजी वनमंत्री पतंगराव कदम ही मंडळी तशी स्टार प्रचारक होती; पण आघाडी तुटल्याने आता ते आपापल्या मतदारसंघात अडकून पडले आहेत. त्यातूनही आर. आर. पाटील राज्यातील इतर मतदारसंघात सभा घेत आहेत. आता इतर मतदारसंघांतील सर्वच पक्षांच्या नेत्यांना स्टार प्रचारकांची गरज भासू लागली आहे. निवडणुकीचे वातावरण तापविण्यासाठी या स्टार प्रचारकांना मोठी मागणी आहे. जाहीर प्रचारासाठी नऊ दिवस असल्याने सर्वच पक्षांचे प्रमुख स्टार प्रचारकांच्या तारखा जुळविण्यात मग्न आहेत. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (रविवारी) तासगावमध्ये सभा होत आहे. आज (शनिवारी) विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी भाजपसाठी आटपाडी आणि वांगीमध्ये सभा घेतली. मोदींबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, स्मृती इराणी, पंकजा मुंडे, नितीन गडकरी यांना प्रचारासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. गडकरी सोमवार, ६ रोजी कामेरीत सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या प्रचाराची मदार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राहील. त्यांच्या काही सभा जिल्ह्यात होणार आहेत. आज नारायण राणे, अभिनेत्री नगमा यांच्या उपस्थितीत सांगलीत मदन पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनाही आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची उद्या (रविवारी) विटा व जतमध्ये सभा होत आहे. पवार यांना जिल्ह्यातील अन्य मतदारसंघातही प्रचारासाठी निमंत्रित केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्याही सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे हेही जिल्ह्यात प्रचारासाठी येणार आहेत. राज ठाकरे यांची एक सभा जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांगलीत सभा झाली. आता त्यांचे चिरंजीव व विद्यार्थी सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा अथवा रोड शो आयोजित केला जाणार आहे. त्याशिवाय रामदास कदम, मनोहर जोशी, आदेश बांदेकर, अमोल कोल्हे यांनाही प्रचारात उतरविले जाणार आहे. नरेंद्र मोदी आज तासगावात तासगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी तासगावात येत आहेत. त्यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तासगावातील दत्त माळावरील दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेच्या मैदानावर ही सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता व त्या अनुषंगाने आवश्यक असणारी व्यवस्था शनिवारी रात्रीपासून करण्यात येत आहे. येथील क्रीडासंकुलच्या मैदानावर पंतप्रधानांची हेलिकॉप्टर्स उतरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ते सभास्थळी कमी वेळातच पोहोचणार आहेत. सभा ११ वाजता सुरू होणार आहे. शनिवारी सकाळपासून सुरक्षा यंत्रणेने तासगावच्या परिसरात पाहणीस सुरुवात केली. पोलिसांच्या गाड्या शहरातून फिरत होत्या. शिवाय सैन्यदलाचे जम्बो हेलिकॉप्टर्सही व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शहरावर घिरट्या घालत असल्यामुळे मोदींच्या सभेची चर्चा सर्वत्र सुरू होती. शनिवारी सायंकाळी भाजपचे पदाधिकारी सभेच्या तयारीची पाहणी करीत होते.
स्टार प्रचारकांमुळे माहोल झाला गरम
By admin | Published: October 04, 2014 11:55 PM