सांगली : रंगभूमीची सेवा करताना रसिकांच्या मनाला मनोरंजनाने सुगंधीत करण्याचे काम प्रदीर्घ काळ करीत असलेल्या सांगलीतील कलाकार, तंत्रज्ञ, लेखकांच्या प्रांगणी आज सन्मानाचे चांदणे शिंपडण्यात आले. निमित्त होते रंगभूमी दिनाचे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सांगलीच्यावतीने रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना पुरस्काराने गौरविण्यात आले. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. गेल्या दोन वर्षांपासून या शाखेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. विष्णुदास भावे नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अभिनेते राजन भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात सांगली (जिल्हा) नगरवाचनालयास ‘विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नगरवाचनालयाचे प्रा. मुकुंद पटवर्धन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देवल स्मारक मंदिर संस्थेला ‘नाना ताडे नाट्यस्वर पुरस्कार’, रंगकर्मी प्रकाश गडदे यांना ‘अरूण पाटील नाट्यतंत्र पुरस्कार’, नाट्यलेखक राजेंद्र पोळ यांना ‘दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार’, श्रीरंग विष्णू जोशी यांना ‘आचार्य अत्रे प्रतिभारंग’ पुरस्काराने, तर ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मधुकर आपटे यांना ‘काकासाहेब खाडिलकर जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविले. ‘तेरे मेरे सपने’ या एकांकिकेतील कलाकार यशोधन गडकरी आणि कविता गडकरी, तसेच रवींद्र कुलकर्णी व जुई बर्वे यांचाही सन्मान करण्यात आला.कीर्ती शिलेदार म्हणाल्या, सांगली ही नाट्यपंढरी तर आहेच, शिवाय येथील नाट्यगृहाला नाट्यमंदिर म्हटले जाते. मंदिरातील पावित्र्य याठिकाणी आल्यानंतर मिळते. यावेळी डॉ. शरद कराळे, श्रीनिवास जरंडीकर, मुकुंद पटवर्धन, भालचंद्र चितळे, विनायक केळकर, डॉ. दयानंद नाईक, चेतना वैद्य, भास्कर ताम्हनकर आदी उपस्थित होते.