मिरज : मिरज शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन व एमआरआय़ यंत्र सुरू करण्याची मागणी ‘मी मिरजकर’ फाउंडेशनतर्फे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मिरज शासकीय रुग्णालयात एमआरआय यंत्र व सिटी स्कॅन नादुरुस्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ही यंत्रे सुरू करावीत, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्याकडे करण्यात आली. सिव्हिलमध्ये उपचारासाठी दररोज शेकडो गरीब रुग्ण येतात. येथील सिटी स्कॅन व एमआरआय तपासणीचा अहवाल मिळत नाही. येथे सेवेतील डॉक्टर बेकायदेशीरपणे इतर रुग्णालयात काम करतात. सिव्हिलमध्ये कोणतीही औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना औषधे विकत घ्यावी लागतात. वैद्यकीय तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठवले जाते. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी पैशाची मागणी केली जाते. मृतदेह नेण्यासाठी खासगी गाडीची सक्ती केली जाते. स्वच्छतेचा अभाव असल्याने सिव्हिल रुग्णालय घाणेरडे व गलिच्छ झाले आहे. १५ दिवसांत याबाबत उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ‘मी मिरजकर’ फाउंडेशनचे निमंत्रक सुधाकर खाडे, महादेव कोरे, मनोहर कुरणे, उमेश कुरणे, शीतल पाटोळे, संजय सूर्यवंशी, विनोद मोरे, प्रभात हेटकाळे, सुधीर गोखले, महेश गव्हाणे यांनी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना निवेदन दिले.