नंदकुमार ढेरे --चंदगड -गेले चार गळीत हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) दौलत साखर कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने बेळगावच्या कुमुदा शुगर्सने टाकलेले पाऊल शेतकरी, सभासद, कामगार यांच्यासाठी निश्चितच आशादायी असून यंदा कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होणे ही काळाची गरज बनली आहे; परंतु कारखान्याचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक नरसिंगराव पाटील यांनी या प्रक्रियेविरोधात आडमुठी भूमिका घेतली आहे. मात्र, कुमुदा शुगर्सने येत्या १ फेब्रुवारीला कारखाना सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याने ‘दौलत’ पुन्हा सुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.गेले चार गळीत हंगाम बंद असलेला, कारखान्यांवर विविध वित्तीय संस्थांचे असलेले डोंगराएवढे कर्ज यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यास कोणीच पुढे येत नसल्याचे चित्र पहायला मिळाले. जिल्हा बँकेने तब्बल आठवेळा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्याकरिता निविदा प्रसिद्ध केल्या, पण त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.दौलत कारखाना बंद असल्याने अन्य साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. कामगार देशोधडीला लागले आहेत. दौलत कोणी चालवायला घेईल ही आशादेखील जवळपास मावळली असताना कुमुदा शुगर्सने कारखाना चालवायला घेण्याची तयारी दर्शविल्याने शेतकऱ्यांसह कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू झालाच पाहिजे या भूमिकेवर शेतकरी, कामगार ठाम आहेत.परंतु कुमुदा शुगर्सच्या निर्णयाला कारखान्याचे माजी अध्यक्ष नरसिंगराव पाटील यांनी विरोध दर्शवत आपण न्यायालयात जाणार असल्याची भाषा केली आहे. त्यामुळे कदाचित कारखाना सुरू होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील पाटील यांनी अशी धमकावणीची भाषा वापरली होती. कारखान्यावरील मोठ्या कर्जाचा बोजा शीरावर घ्यायचा आणि त्याला पुन्हा राजकीय विरोध यामुळे बाहेरील कंपन्या कारखाना चालवण्यास पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वी पहायला मिळाले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेच्या प्रयत्नांमुळे बेळगावच्या कुमुदा शुगर्सने २९ वर्षांच्या कराराने कारखाना चालवण्याचे धाडस दाखवले हे स्वागतार्ह आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल. नेत्यांनी स्वार्थ बाजूला ठेवावादौलत कारखाना बंद असल्यामुळे नेतेमंडळींचे फारसे नुकसान झाले नसले तरी शेतकरी व कामगार मात्र पुरते अडचणीत आले आहेत. आजवर कारखान्याचा वापर राजकारणासाठी झाल्याने ‘दौलत’ची ही स्थिती निर्माण झाली आहे. आतातरी राजकीय नेत्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवावा, अन्यथा चंदगडचा शेतकरी, कामगार संबंधितांना कधीच माफ करणार नाही.चाचणी हंगामासाठी ऊस देऊकुमुदा शुगर्सने २९ वर्षांच्या कराराने दौलत भाडेतत्त्वावर चालवण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी निविदेसोबत भरावयाची १ कोटी रूपयांची अनामत रक्कमही जिल्हा बँकेकडे भरली आहे. कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेताना १० कोटी, १५ कोटींची बँक गॅरंटी, मार्चअखेर १० कोटी व उर्वरित कर्ज समान हप्त्यात फेडण्याची तयारी दर्शविली आहे. प्रत्यक्ष ताबा घेण्यास आणखी आठ-दहा दिवस लागतील. त्यानंतर मशिनरींची दुरूस्ती करून कारखाना सुरू करण्यास मार्च उजाडेल. तोपर्यंत यंदाचा ऊस हंगाम संपत आलेला असेल. मात्र, कुमुदा शुगर्सने यंदा दौलतची चाचणी घेतल्यास त्यासाठी लागणारा किमान ५० हजार टन ऊस चंदगडचे शेतकरी उपलब्ध करून देण्यास तयार आहेत.
‘दौलत’ सुरूव्हावा
By admin | Published: January 04, 2016 12:06 AM