सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात गेली आठ महिने बंद असलेली श्वानांची नसबंदी मोहीम सुरू करावी, अशी मागणी प्राणी क्रुरता क्लेष कमिटीचे सदस्य अजित काशिद यांनी आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्च २०२० पासून म्हणजेच गेली आठ महिने श्वानांची नसबंदी व लसीकरण मोहीम बंद आहे. लोकांच्या तक्रारीनुसार मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम सध्या सुरू आहे. सध्या भटक्या कुत्र्यांना पकडून अन्य भागात सोडले जाते. एका भागातून कुत्री दुसऱ्या भागात सोडण्याने हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी उपाय म्हणून नसबंदी व लसीकरण मोहीम सुरू करणे आवश्यक आहे.
ही मोहीम सुरू राहिली, तर मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण राहील. यामुळे कुत्री या भागातून पकडून दुसऱ्या भागात सोडण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तातडीने याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.