ढालगाव : येळावी (ता. तासगाव) येथील गावडे बंधूंच्या मानाच्या गोड्या नैवेद्याने बुधवार, दि. १० रोजी आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा देवाच्या यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. आज, गुरुवार, दि. ११ रोजी सार्वजनिक गोडा नैवेद्य आहे, तर शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत एक लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.यात्रेत पाणी योजनेचे शुद्ध पाणी भाविकांना मिळत आहे. महांकाली कारखान्याने दोन टँकरची सोय केली आहे, तर सहा ठिकाणी पाच हजार लिटरच्या टाक्यांंची सोय केलेली आहे. त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात भाविकांना मिळत आहे. पाणी निर्जंतुकीकरण व आरोग्य सुविधांसाठी ढालगावचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सतीश कोळेकर व त्यांचे कर्मचारी यांनी पाणी शुद्धतेची तपासणी केली. यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दीडशेवर पोलिसांचा फौजफाटा आज दाखल होणार आहे, अशी माहिती कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी दिली.यात्रेत वीजपुरवठाही अखंडितपणे सुरु आहे. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत लक्ष ठेवले आहे. यात्रेत नारळ, बांगड्या विक्रेते, हॉटेल्स, मेवा-मिठाईवाले, रसवंतीगृहे, हळदी-कुंकू, खेळणी स्टॉल्स, शीतपेयांची दुकाने थाटली आहेत. यात्रा काळात दारूबंदीची प्रथा कायम ठेवलेली असून, १२ तारखेपर्यंत दारूविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सांगली आगारामार्फत तात्पुरत्या बस थांब्याची उभारणी केली जाणार आहे. या ठिकाणाहून बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, पुजारी प्रयत्न करत आहेत.
आरेवाडी येथील बिरोबा यात्रेस उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:25 PM