सांगली : सांगली जिल्ह्यातील घरगुती विलगीकरणाची सुविधा रद्द करतानाच या रुग्णांसाठी तालुकानिहाय जम्बो कोविड सेंटर सुरू करावीत, अशी मागणी रुग्ण साहाय्य व समन्वय समितीचे सतीश साखळकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक थांबत नसल्याने होम आयसोलेशनची सुविधा बंद करण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत झाला. सोमवारअखेर १३ हजार २७० सक्रिय रुग्ण असून त्यातील १० हजार ४४४ रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर शंभर टक्के नियंत्रण नसल्याने सुपर स्प्रेडर ठरत आहेत. कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने संसर्ग फैलावत आहे. शासनाच्या निर्णयानुसार त्यांची रवानगी आता संस्थात्मक विलगीकरणात केली जाईल.
दुसऱ्या लाटेत गावोगावी संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरु झालेली नाहीत. हे लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी समितीचे सतीश साखळकर यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, हा निर्णय आत्मघाती ठरणार आहे. सर्व रुग्णांना कोविड सेंटरमध्ये राहणे शक्य नाही. त्याचा खर्च कोण करणार हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने तालुकानिहाय ५०० बेडची जम्बो कोविड केअर सेंटर्स सुरू करावीत.
फैलाव रोखण्यासाठी प्रत्येक होम आयसोलेशनबाहेर बोर्ड लावावा. त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी स्थानिक रहिवाशांवर तसेच कोरोना व्यवस्थापन समित्यांवर सोपवावी. प्रभाग समिती व स्थानिक पोलीस ठाण्यांवरही जबाबदारी सोपवावी.