सांगली : राज्यात व जिल्ह्यात मटका सुरू करावा, अशी मागणी करत आंदोलन करणाऱ्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. समाजविघातक मागणी करून बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड, प्रदेशाध्यक्ष आमोस मोरे, युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते, विक्रम मोहिते, संजय माेहिते व अन्य तिघांचा समावेश आहे.सोमवारी (दि. २४) राष्ट्रविकास सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यात राज्यात व जिल्ह्यात मटका सुरू करण्यात यावा अशी अजब मागणी करण्यात आली. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजीही केली होती. आंदोलनकर्त्यांनी मटका सुरू करावा अशी समाजविघातक मागणी केल्याने याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश दिला असतानाही अशाप्रकारे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, सद्दाम मुजावर, संजय मोटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
अजब मागणी! सांगली जिल्ह्यात मटका सुरू करा, आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By शरद जाधव | Published: April 28, 2023 6:48 PM