लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने सुरू झाली आहेत. हरभट रोड, गणपती पेठ, कापड पेठ, सराफ कट्टा या परिसरातील व्यवसाय पूर्वपदावर आले आहेत. मारुती चौकातील दुकाने मात्र अजूनही चिखलातच आहेत. तेथील व्यापाऱ्यांनी दुकानांची स्वच्छता हाती घेतली होती.
गेले वर्षभर कोरोना संकटाशी मुकाबला करणाऱ्या व्यापाऱ्यांना यंदा महापुरानेही मोठा झटका दिला. दुसऱ्या लाटेत साडेतीन महिने बाजारपेठ बंद आहे. त्यात कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी बाजारपेठेतही शिरले. हरभट रोड, कापड पेठ, सराफ कट्टा, मारुती रोड, मेन रोडवरील दुकाने पाण्याखाली गेली होती. मारुती रोड वगळता अन्य रस्त्यांवरील पुराचे पाणी दोन दिवसातच ओसरले. महापालिकेने तातडीने या परिसराची स्वच्छता केली. दुकानांत मोठ्या प्रमाणात चिखल होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानांची स्वच्छता करत नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. शुक्रवारी कापडपेठेतील सर्वच दुकाने सुरू झाली होती. मेन रोडवरील काही दुकानांत स्वच्छतेचे काम सुरू होते. सराफ कट्टा परिसरातील दुकाने उघडली होती. हरभट रोडवरील दुकानांतही व्यवहार सुरू होते.
मारुती रोडवरील पाणी ओसरण्यास जादा वेळ लागला. हा रस्ता गुरुवारी खुला झाला. शुक्रवारपासून मारुती रोडवरील व्यापाऱ्यांनी दुकाने स्वच्छतेसाठी उघडली. यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणात चिखल होता. मोटारीच्या सहाय्याने पाणी मारुन दुकानाची स्वच्छता सुरू होती. अजून दोन ते तीन दिवस या परिसराच्या स्वच्छतेसाठी लागणार आहेत. मारुती चौकासह रस्त्यावरही चिखल आहे.
चौकट
भाजी मंडई चिखलात
मारुती चौकातील छत्रपती शिवाजी मंडईचा परिसर अजूनही चिखलात आहे. मंडईच्या फुटपाथवर फुटभर चिखल आहे. तर मारुती चौक ते रिसाला रोड या रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले आहे. तेथील मंडईही चिखलमय झाली आहे. या परिसरात दुर्गंधी पसरली होती.
चौकट
दोन दिवसात बाजारपेठ चकाचक
महापालिकेने यंदा पुरानंतर स्वच्छतेच्या कामाला गती दिली होती. त्यामुळे हरभट रोड, कापड पेठ, गणपती पेठ, सराफ कट्टा हा परिसर दोन दिवसात चकाचक झाला. संपूर्ण बाजारपेठेत महापालिकेकडून पावडरची फवारणीही करण्यात आली आहे.