कुपवाड : कुपवाड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तपासणीसाठी येथील नागरिकांना सांगली, मिरजेला हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे कुपवाडसाठी शहरात स्वतंत्र अँटिजेन टेस्ट केंद्र सुरू करा, अशी मागणी नगरसेवक गजानन मगदूम यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन मगदूम यांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे दिले आहे.
कुपवाड शहरामध्ये महापालिकेच्या ॲलिओपेथिक दवाखान्यात सध्या लसीकरण सुरू आहे. यासाठी नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, याठिकाणी अँन्टीजन टेस्ट करण्याचे काम सुरू नाही. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत तसेच ज्या कुटुंबामधील काही जणांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यांच्या नातेवाईकांची टेस्ट करण्यासाठी कुपवाड शहरात सध्या कोणतीही सोय नाही.
सदरचे रुग्ण इतरत्र फिरल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कुपवाडमध्ये तातडीने अँटिजेन टेस्ट केंद्र सुरू करावी. संबंधित यंत्रणेला कर्मचारी पुरविण्यासंदर्भात योग्य ते आदेश द्यावेत. केंद्र सुरू झाल्यास तपासणीसाठी येथील नागरिकांना सांगली, मिरजेला मारावे लागणारे हेलपाटे वाचतील, असेही त्यांनी म्हटले आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व आयुक्त नितीन कापडनीस यांना देण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक गजानन मगदूम यांनी दिली आहे.