ओळी :- महापालिकेच्या लसीकरण केंद्राला महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी होणारी गर्दी, नियोजनाचा अभाव, एकाच छताखाली सुरू असलेले लसीकरण व कोरोना चाचणीवर ‘लोकमत’ने रियालिटी चेकद्वारे प्रकाशझोत टाकला. या वृत्ताची दखल घेत महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी लसीकरण केंद्राला भेटी दिल्या. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांसाठी दूरध्वनी सेवा सुरू करा, अशी सूचना केली.
महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह १८ ठिकाणी कोरोना लसीकरण सुरू आहे. या केंद्रावर
लसीकरणासाठी झुंबड उडाली आहे. आरोग्य विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असल्याचे विदारक चित्र सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले होते. सर्रास केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अनेक जण मास्कच न लावताच केंद्रावर आले होते. या वृत्ताची दखल महापौर सूर्यवंशी यांनी घेतली. मंगळवारी महापौरांनी हनुमान नगर, गावभाग, हसनी आश्रम येथील आरोग्य केंद्राला भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी, वैद्यकीय सोयी-सुविधांची माहिती घेतली. लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी करून थांबावे लागत असल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आली. ही गर्दी टाळण्यासाठी सकाळी ९ ते ११ या वेळेत नागरिकांची नाव नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार नागरिकांना दूरध्वनी करून केंद्रावर बोलावून घ्यावे. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे वाचतील. नागरिकांनीही आरोग्य केंद्रातून दूरध्वनी आल्यावर लसीकरणासाठी बाहेर पडावे, अशा सूचना केल्या. काही आरोग्य केंद्रात लसीकरण व कोरोना चाचण्या एकत्र सुरू असून, त्याबाबतही आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दक्षता घेण्याची सूचना केली.
यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, सविता मदने, डाॅ. अलका तोडकर, डाॅ. शीतल धनवडे, डाॅ. आशुतोष चोपडे उपस्थित होते.