वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथे विश्वजित कदम यांनी टेंभू व ताकारी उपसा सिंचन योजनांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार व ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, टेंभू योजनेच्या आवर्तनाबाबत शेतकरीवर्गातून खूप तक्रारी येत आहेत. आवर्तनास आधीच विलंब झाला आहे. आता शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करायला लावू नका. शेती पिके धोक्यात असताना कोणतीही सबब न सांगता आवर्तन सुरू केले पाहिजे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या आणि सिंचन योजनांच्या प्रश्नावर सर्वतोपरी सहकार्य आहे. कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक १ (अ) मध्ये पाणी उद्यापासून पाणी अडविण्यात येईल व आवश्यक पाणीसाठा होताच तत्काळ आवर्तन सुरू होईल, असे सांगितले. यावेळी सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांतराम कदम, जितेश कदम उपस्थित होते.
ताकारीची कामे मार्गी लागणार
ताकारी योजनेचे आवर्तन सुरू आहे. मात्र, बंदिस्त पाईपलाईन व वितरकांची काही कामे अपूर्ण आहेत. ही कामे तत्काळ सुरू करून योजनेच्या संपूर्ण लाभक्षेत्रात शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी द्या. पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहेत. आता त्यांच्यावर नियमाप्रमाणे जबाबदाऱ्या सोपवा, अशा सूचना कदम यांनी दिल्या.