आटपाडी : टेंभू योजनेच्या वंचित गावांच्या कामांना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निधी देऊन तत्काळ कामे सुरू करावीत, अन्यथा विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुबंई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा लिंगीवरे (ता. आटपाडी) येथील पाणीपरिषदेत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. यावेळी विविध ठराव करण्यात आले आहे.बुधवारी लिंगीवरे येथील धुळाजी झिंबल हायस्कूलच्या मैदानावर पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे नेते आनंदराव पाटील, साहेबराव चवरे, जनार्दन झिंबल, विजयसिंह पाटील, महादेव देशमुख, मनोहर विभूते, बाळासाहेब पाटील, सादिक खाटिक, दत्तात्रय यमगर, नानासाहेब मोटे, दादासाहेब हुबाले उपस्थित होते.यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, आटपाडी तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून वंचित असणारी १२ गावे २०१९ मध्येच समाविष्ट झाली आहेत. नव्याने काही जणांनी सुप्रमा मंजूर झाल्याच्या उद्घोषणा केल्या आहेत. मात्र त्या गावचा समावेश २०१९ मध्येच झाला आहे. सुप्रमा जरी आता मंजूर झाली असली तरी सध्या त्या कामाला निधी मिळणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ५ हजार घनमीटर प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी आनंदराव पाटील म्हणाले, चळवळीच्या रेट्यामुळेच टेंभू योजनेचे ८५ टक्के पाणी मिळाले आहे. शासनाकडे पहाटेचा शपथविधी व प्रवेश सोहळा घेण्यास वेळ आहे. मात्र दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यास वेळ नसल्याची टीका केली. यासाठी राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.राज्यशासनाने दुष्काळी भागातील जनतेला विश्वासात घेऊन लवकर निधी मंजूर करावा, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा ही देण्यात आला आहे. राजेवाडी तलाव हा सांगली पाटबंधारे विभागाला जोडावा तरच राजेवाडी परिसरातील नागरिकांना लाभ होईल. राजेवाडी तलावात उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली जाते. मात्र उरमोडीकडे पाणी शिल्लक नाही व जिहे कटापूर योजना आठ महिन्यांची आहे.