उंब्रज : उंब्रज, ता. कऱ्हाड येथे प्रथमच होत असलेले राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी परिसरातील शाळेच्या हजारो विद्यार्थी-विद्यार्थिंनी सहभागी झाल्याने गावातून काढलेली फेरी ही अभूतपूर्व झाली. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या अध्यक्ष कमल नांगरे होत्या. तर सरपंच लता कांबळे, ग्रामपंचायत सदस्य या सह नागरिक, महिला उपस्थित होते.उंब्रज येथील महात्मा गांधी विद्यालय प्रांगणात त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मान्यवर व संयोजक समिती, नागरिक, महिला यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. यामध्ये सहभागी झालेल्या महात्मा गांधी विद्यालय, महिला महाविद्यालय, कन्या शाळा, यशवंतराव जाधव विद्यालय, होली कॉन्व्हेट स्कूल, ग्लोबल इंग्लिश मेडियम स्कूल, आदर्श शाळा, जिल्हा परिषद शाळा या सर्व विद्यालयाच्या हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी फेरीत सहभागी झाले होते. सुरुवातीला लेझीम पथक, वारकरी संप्रदाय टाळ-मृदुंगाचा गजर करीत हरिनामाचा गजर सुरू होता. त्यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. तसेच त्यापाठोपाठ पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी होते. महिला महाविद्यालयाच्या युवती घोडेस्वार होऊन राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ, सावित्रीबाई होळकर, म्हाळसा तर युवकांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, गाडगेबाबा अशा वेगवेगळ्या वेषभूषा करून घोड्यावर ते स्वार झाल्या होत्या. यामध्ये वेगवेगळ्या साहित्याविषयी माहिती करून देणारे फलक तसेच स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, ‘वृक्ष संवर्धनाचे संदेश, लेक वाचवा’ या संदेशाचे फलक, झळकत होते. फेरी सुरभी चौकातून सरळ माणिक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक आली. त्यावेळी शिवाजी महाराज पुतळ्यासमोर युवतींनी लेझीम सादर केले. त्यानंतर साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेला भव्य मंडप हा विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांनी भरगच्च भरून गेला. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. डॉ. सुनील कोडगुले यांनी प्रास्ताविक केले. रंजना जाधव यांनी आभार मानले. ‘लेक वाचवा’ या विषयावर सुनीता जाधव या युवतीने उस्फूर्त दाद मिळवली. (प्रतिनिधी)
उंब्रजमध्ये त्रिवेणी साहित्य संमेलनाला प्रारंभ
By admin | Published: January 22, 2017 11:57 PM