पेठ : पेठ येथील लोकसहभागाची चळवळ पाहून आम्ही प्रभावित झालो. त्यामुळेच राज्यात प्रथमच पेठ येथे नदीपात्रात टायर बंधाऱ्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. कौस्तुभ आमटे यांनी केले. टाकाऊ वस्तूंपासून बंधारा कामास सोमवारी प्रारंभ झाला.पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम चार महिन्यांपासून सुरु आहे. या नदीमध्ये टायर बंधाऱ्याची अर्थात ‘कर्मयोगी बाबासाहेब आमटे स्मृती बंधारा’ निर्मिती केली जाणार आहे. या कामाचा प्रारंभ सोमवारी आमटे यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रुपाली सरनोबत, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, गटविकास अधिकारी राहुल गावडे, पं. स. सदस्य प्रकाश पाटील उपस्थित होते. आमटे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखत दुष्काळावर मात करण्यासाठी टायर व टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचा उपक्रम आम्ही आमच्या भागात केला आहे. आम्ही अशाप्रकारे ८ बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत आता पेठ येथे प्रथमच लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंद्रजित देशमुख म्हणाले, सर्वांनीच सकारात्मक दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. पुढील पिढीला काय देऊ शकतो, याचा विचार करायला हवा. पेठप्रमाणेच असे उपक्रम राज्यभर राबविल्यास दुष्काळाचा सामना यशस्वीपणे करता येईल.आमदार नाईक म्हणाले, शासनाच्या जलशिवार योजनेंतर्गत आमच्या भागात अनेक कामे केली आहेत. पेठ येथील उपक्रम कौतुकास्पद आहे. सम्राट महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश पाटील यांनी स्वागत, तर भाई संपतराव पवार यांनी प्रास्ताविक केले. पंडित लोहार यांनी आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी राहुल गावडे, शांताराम देशमाने, जगन्नाथ माळी, बजरंग कदम, कृष्णात पाटील, डी. जी. खोत, सूर्यकांत शिंदे, हमणंत कदम, संदीप पाटील, बी. जी. पाटील, विलास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)वाया जाणारे पाणी शेतीसजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात २५0 कि. मी. इतकी जलसंधारणाची कामे केली असून टेंभू योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आम्ही ओढे, नाल्याला पावसाचे जाणारे पाणी अडवून ते पाणी शेतीला कसे देता येईल, याचाही अभ्यास केला आहे. हा उपक्रम लवकरच राबविला जाईल.
पेठमध्ये टाकाऊ वस्तूंपासून बंधाऱ्यास प्रारंभ
By admin | Published: June 21, 2016 12:17 AM