मिरज : आरक्षित तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने १ नोव्हेंबरपासून विकल्प सेवा सुरू केली आहे. आॅनलाईन रेल्वेचे आरक्षित तिकीट काढणाऱ्या प्रवाशाचे आरक्षित तिकीट त्या मार्गावर धावणाऱ्या दुसऱ्या रेल्वे गाडीत निश्चित करण्याची सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. दिल्ली ते जम्मू व दिल्ली ते लखनौ यादरम्यान धावणाऱ्या रेल्वेसाठी प्रायोगिक तत्त्वावर विकल्प सेवा सुरू झाली आहे. रेल्वे तिकिटाचे आरक्षण केल्यानंतर प्रतीक्षा यादीवर असलेल्या तिकिटाचे आरक्षण निश्चित झाले नाही, तर आरक्षण केलेल्या गाडीच्या सुटण्याच्या वेळेपासून पुढील बारा तासात त्याच मार्गावर धावणाऱ्या इतर गाडीमध्ये उपलब्धता असेल, तर त्या गाडीमध्ये आरक्षण मिळणार आहे. तशी सूचना करणाऱ्या प्रवाशास त्याने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारा माहिती देण्यात येणार आहे. विकल्प सेवेअंतर्गत प्रतीक्षा यादीतून आरक्षण निश्चित झालेले तिकीट दुसऱ्या गाडीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. दुसऱ्या गाडीतून प्रवासासाठी वेगळ्या तिकिटाची आवश्यकता असणार नाही. तिकीट एका गाडीऐवजी दुसऱ्या गाडीत निश्चित झाल्यानंतर रद्द करावयाचे असेल, तर त्यासाठी नियमाप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल. नवीन विकल्प सेवा आरक्षण सुविधेचा लाभ घेताना प्रवाशाला चढण्याच्या किंवा उतरण्याच्या ठिकाणात थोडा बदल करून आरक्षित जागा मिळणार आहे. नवीन आरक्षण सुविधेअंतर्गत निश्चित झालेले आरक्षित तिकीट मूळ गाडीच्या आरक्षण यादीत दिसणार नाही. सध्या ही सुविधा फक्त ई-तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी दिल्ली-जम्मू व दिल्ली-लखनौ या मार्गावरील रेल्वेसाठी प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे आरक्षण कार्यालयातून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीही व देशभरातील सर्व मार्गांवर विकल्प ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
रेल्वेची विकल्प सेवा सुरू
By admin | Published: November 08, 2015 11:06 PM