सांगली : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्याचा मोठा फटका शासकीय संगणक टायपिंगच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल घोटाळ्यामुळे रखडला आहे. त्यामुळे राज्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. टायपिंग प्रमाणपत्राशिवाय नोकरीसाठी अर्ज करणेही या विद्यार्थ्यांना मुश्किल झाले आहे.राज्य परीक्षा परिषदेकडून सहा महिन्यातून एकदा संगणक टायपिंग परिक्षा घेतली जाते. गेली दोन वर्षे कोरोामुळे या परीक्षांना विलंब झाला होता. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये ऑफलाईन लघुटंकलेखनच्या तर नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने संगणक टायपिंगच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेला राज्यभरातून दोन लाखहून अधिक विद्यार्थी बसले होते. याच दरम्यान टीईटी घोटाळा उघडकीस आला.पुणे पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेच्या कारभाराची चौकशी सुरू केली. काही विभाग सीलही केले आहेत. त्यामुळे टायपिंग परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला. परीक्षा होऊन साडेतीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरीही निकालाबाबत कसल्याच हालचाली राज्य परीक्षा परिषदेकडून झालेल्या नाहीत. परिणामी विद्यार्थी, पालक व संस्था संस्थाचालक चिंतेत सापडले आहेत.
विद्यार्थ्यांची कोंडी
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या टायपिंग परीक्षेचा निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासह विविध नोकरीसाठी टायपिंग प्रमाणपत्र नसल्याने त्यांना अर्जही करता येत नाही. पहिल्या परीक्षेचा निकाल लागल्याशिवाय दुसऱ्या परीक्षेला विद्यार्थी पात्र ठरत नाहीत. शिवाय या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना रिपीटर म्हणून पुढील परीक्षा देता येते. पण पहिल्याच परीक्षेचा निकाल झाला नसल्याने रिपीटर म्हणून परीक्षेसाठी अर्जही करता आलेला नाही. शासनाने फेब्रुवारी-मार्चमध्ये टायपिंग परिक्षा घोषित केल्या आहेत. पण त्याही आता लांबणीवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या टायपिंग परीक्षेच्या निकाल लांबणीवर गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. परीक्षेनंतर ४५ दिवसात निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. पण साडेतीन महिने झाले तरी निकाल लागलेला नाही. राज्य शासनमान्य संस्थांची संघटना या राज्यव्यापी संघटनेकडून मंत्र्यांना निवेदन देऊन निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना नोकरीसह इतर परीक्षांनाही अर्ज करता येईना. त्यामुळे शासनस्तरावर टायपिंग परिक्षेबाबत लवकर निर्णय व्हावा.- रवी जेरे, अक्षय काॅम्प्युटर इन्स्टिट्युट, सांगली