विटा : विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक असून, विचाराने मतदान करण्याची गरज आहे. राज्यात आघाडीत बिघाडी झाली ते बरे झाले. बेभरवशाची माणसे बाजूला गेली कारण त्यांनी आघाडी धर्म कधीच पाळला नाही, असा हल्ला राष्ट्रवादीवर चढवत राज्यात कॉँग्रेस पक्ष स्वबळावर सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.आटपाडी येथे आज (शनिवारी) खानापूर मतदारसंघाचे कॉँग्रेसचे उमेदवार आ. सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी आ. पाटील, आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, रामभाऊ पाटील, भारत पाटील, वसंतराव गायकवाड, जयदीप भोसले, वलवणचे सदाशिव पाटील, रामरावदादा पाटील, प्रतापदादा साळुंखे, रवींद्रअण्णा देशमुख, जि. प. सदस्य डॉ. नामदेव माळी उपस्थित होते.माजी मंत्री पाटील म्हणाले की, कॉँग्रेसच्या कोणत्याही आमदार व मंत्र्यांवर डाग नाही. राष्ट्रवादीच्याच भानगडी जास्त आहेत. त्यामुळे यावेळी आघाडी तुटली ते योग्य झाले. कारण राष्ट्रवादीच्या भानगडीचे सर्व खापर कॉँग्रेसवर फुटले असते. खानापूरचे आमदार सदाशिवराव पाटील यांनी टेंभू योजनेसाठी दहा मिनिटे सभागृह बंद पाडले. निधी मंजूर घेतला. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आ. पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करावी.केंद्राच्या निर्यातबंदीमुळे डाळिंब व साखरेचे दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. परंतु, दुसऱ्या बाजूला सिमेंटचे भाव वाढवून गुजरातमधील सिमेंट कंपन्यांचे केंद्राने भले केले. अमेरिकेतील १०८ औषधांच्या फाईलवर सही करायची असेल तरच अमेरिकेला या, असा अमेरिकेने फतवा काढल्यानंतरही मोदी अमेरिकेला जाऊन त्या फाईलवर सही केल्याने औषधांच्या किमती वाढल्या. त्याला केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी माजी मंत्री पाटील यांनी केला.आ. पाटील म्हणाले की, दुष्काळात कॉँग्रेसने चारा छावण्यांसह अन्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. सर्वांत जास्त डाळिंब अनुदान आटपाडीला मिळाले. विकास कामात खानापूर व आटपाडी असा भेदभाव केला नाही. दत्तोपंत चोथे यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष झाकीर तांबोळी, बाबूराव गायकवाड, पृथ्वीराज पाटील, दीपक पाटील, विजय पुजारी भैय्या मोरे, जयकुमार देशमुख, राधेशाम जाधव, संभाजी ठोंबरे उपस्थित होते. (वार्ताहर)
राज्यात कॉँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करणार
By admin | Published: October 12, 2014 12:52 AM