इस्लामपूर : येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांची राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कारखान्याच्या स्थापनेपासून ५४ वर्षे संचालक आणि ३० वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा दीर्घ अनुभव पाटील यांच्या पाठीशी आहे.मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडून पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. राजारामबापू उद्योग समूहाचे मार्गदर्शक, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.राजारामबापू पाटील यांनी १९६८ मध्ये साखराळेत स्थापन केलेल्या वाळवा तालुका (सध्याचा राजारामबापू) सहकारी साखर कारखान्याच्या प्रवर्तक मंडळात पहिल्यांदा पी. आर. पाटील यांचा समावेश झाला. पहिल्या संचालक मंडळापासून ते आजअखेर ५४ वर्षे ते संचालक, तर गेल्या ३० वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.वाटेगाव-सुरुल शाखेची स्थापना, सर्वोदय कारखान्यासोबतचा करार आणि त्याचे राजारामबापूकडे स्वामित्व घेणे यासह जत-तिप्पेहळ्ळी येथील कारखाना खरेदी करणे अशा महत्त्वपूर्ण विस्तारीकरणामध्ये त्यांच्या नेतृत्वगुणांची छाप पडली. साखराळे शाखेचे अत्याधुनिक आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी, अर्कशाळा प्रकल्पाचा विस्तार आणि आधुनिकीकरण अशा सर्व कामांमध्ये त्यांचे योगदान आहे. साखर उद्योगातील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
शरद पवारांचा शब्ददोन वर्षांपूर्वी पी. आर. पाटील यांचा कुरळप या जन्मगावी अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त खासदार शरद पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार यांनी पाटील यांच्या साखर कारखानदारीतील अनुभवाचा फायदा राज्याला देण्यासाठी राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड करीत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी पाटील त्या पदावर विराजमान झाले.