वाटेगाव : सध्या रसिकांच्या मागणीवरून तमाशाचे स्वरूपच बदलले आहे. आजच्या पोरांना मॉडेल लागते. तिला नाचायला आले नाही, तरी चालते. आपली तमाशा कला, लोककला, शाहिरी जिवंत ठेवण्यासाठी मायबाप रसिकांनी प्रोत्साहन द्यायला हवे, अशी भावना राष्ट्रपती पदक विजेत्या, ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली.वाटेगाव (ता.वाळवा) येथील पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. अण्णा भाऊ साठेंच्या सून सावित्री साठे, नातू सचिन साठे, चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर, रवींद्र बर्डे, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, अंकल सोनवणे, शीतल साठे, महेंद्र रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.बनसोडे म्हणाल्या, अण्णा भाऊंकडून कथानक घ्यायचो. आम्ही बसवलेली फकिरा, कृष्णाकाठचा फरारी, आवडी, डोंगरची मैना अशी वगनाट्ये रसिकांनी डोक्यावर घेतली. रसिकांनी टीव्ही आणि सिनेमाबरोबर आम्हालाही प्रोत्साहन द्यायला हवे.डॉ. पाटणकर म्हणाले, शाहीर, लोक कलावंतांची वाटेगावात पंढरी करण्याचा प्रयत्न आहे. प्रा. डॉ. गुरव म्हणाले, शाहीर हा केवळ कलावंत नसून पुरोगामी विचारांचा कार्यकर्ताही आहे. सचिन साठे म्हणाले, सध्या चळवळी मारल्या जात असताना शाहिरी आणि लोककला टिकवावी लागेल. यावेळी महेंद्र रोकडे यांनी चळवळ पुढे नेण्याचे आवाहन केले. स्वागताध्यक्ष बर्डे म्हणाले, दरवर्षी लोकजागर वाटेगावमध्ये घेऊन साहित्याची पंढरी करू.यावेळी मुंबई विद्यापीठास अण्णा भाऊंचे नाव द्यावे असा ठराव केला. प्रारंभी अण्णा भाऊंच्या पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी धनाजी गुरव, प्रा. सचिन गरुड, प्रा. डॉ. शरद गायकवाड, विजय मांडके, सचिन माळी, प्रा.गौतम काटकर, सदाशिव निकम, रमेश बल्लाळ, रणजित कांबळे, आनंदा थोरात, अनिकेत मोहिते, जनार्दन साठे उपस्थित होते. जयंत निकम यांनी सूत्रसंचालन केले. योगेश साठे यांनी आभार मानले.
‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची’ मंगला बनसोडे यांनी ‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची’ ही लावणी सादर करून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या. शीतल साठे यांनी 'माझी मैना' ही अण्णा भाऊंची छक्कड तसेच 'अण्णाभाऊंचे नाव द्या हो, मुंबई विद्यापीठाला' गीत सादर केले.