सांगली : पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हजारो घरांसह, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळची पूरस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत असल्याने, यापुढे घरांचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच पूरग्रस्तांना जागा खरेदीसाठी सरकारकडून पैसे देण्याबरोबरच घरे बांधून देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थिती आणि मदत आढावा बैठकीनंतर महसूलमंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पूरग्रस्तांना सावरण्याबरोबरच त्यांना अधिक मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूलमंत्री पाटील म्हणाले, पूर ओसरला असला तरी प्रशासनासमोर स्वच्छतेसह पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे आव्हान होते. पुरामुळे जिल्ह्यातील चार लाखांवर स्थलांतरित झालेली कुटुंबे घरी परतली असली तरी, त्यांना सावरण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. पूरग्रस्तांना संकटातून बाहेर काढत मदतीसाठी सरकारचे प्राधान्य असणार आहे. पुरातून सावरलेल्या कुटुंबांसाठी तात्काळ पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.
जिल्ह्यात आलेली यंदाची पूरस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या लोकांना वारंवार पुराचा सामना करावा लागत आहे. सतत घरांना पुराचा फटका बसणार नाही, याबाबतची दक्षता सरकारकडून घेतली जाणार आहे. पुरामुळे बाधित झालेल्या घरांच्या उभारणीचे मोठे आव्हान सरकारपुढे असणार आहे. या भागातील जनजीवन स्थिरावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यात पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. पूरग्रस्त कुटुंबांना जागा खरेदीसाठी सरकारकडून पैसे देण्यात येतील, जेणेकरून पुन्हा पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागणार नाही.
यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महापौर संगीता खोत, आमदार पृथ्वीराज देशमुख, अप्पर सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.धोकादायक घरात कोणीही राहू नयेमहसूलमंत्री पाटील म्हणाले, पूरग्रस्त भागातील पंचनामे सुरू आहेत. धोकादायक घरांमध्ये कोणीही राहू नये. नवीन घर पूर्ण होईपर्यंत ग्रामीण भागात २४ हजार, तर शहरात ३६ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. नवीन घर बांधण्यासाठी ग्रामीण भागात अडीच, तर शहरी भागात साडेतीन लाख रुपये देण्यात येणार आहेत. सरकार पूरग्रस्तांना पूर्णपणे सावरण्यासाठी तयार आहे.राजू शेट्टींची प्रगल्भता मोठीस्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी पुराबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. यावर महसूलमंत्री पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता, शेट्टी हे मोठे नेते आहेत. त्यांची प्रगल्भता जादा आहे. मी स्वत: दिवसभरात अनेक गावात जाऊन पूरस्थितीबाबतची माहिती घेत आहे. त्यात कोठेही कोणीही सरकारविरोधात बोलत नाहीत. त्यामुळे आता शेट्टींनी सरकारविरोधात मोर्चे काढण्यापेक्षा पूरग्रस्तांना सावरण्यासाठीच्या उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.