सांगली : शिवरायांनी स्वराज्यातील जनतेला आपले मानले. जनताही त्यांच्यामागे राहिली. त्यामुळे शिवशाही सरकार आपलेसे वाटायचे. तशी आता स्थिती नाही. सरकार आपले आहे, अशी भावना जनतेत निर्माण होणारी कामे केली पाहिजेत, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगलीतील सभेत व्यक्त केले. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राने शिवसेनेला कधीच पूर्ण ताकद दिली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिव प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीतील शिवाजी क्रीडांगणावर हिंदवी स्वराज्य मानवंदना सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व हे राजकारणासाठी नसून, राज्याच्या हितासाठी आहे. आपले जवान देशाच्या सरहद्दीवर लढत असताना, आपण मात्र कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळतो. आमचे भांडण हिंदू-मुस्लिम असे नाही. औरंगजेबने हिंदूंची अनेक मंदिरे पाडली. पण शिवरायांनी एकही मशीद पाडली नाही. दुसऱ्या देशातील लोक भारतात आणि राज्यात राहत असतील, तर त्यांनी येथील संस्कृती मानली पाहिजे. ते म्हणाले, शिवाजी महाराज आग्रा येथे तुरुंगात असताना त्यांच्या राज्यात कोणीही बंडखोरी केली नाही. महाराजांचा इतिहास, त्यांची प्रेरणा, ध्येय व आदर्श याचा अलीकडच्या पिढीला विसर पडल्याचे दिसून येते. अफझलखान वधावरून आजही वादंग निर्माण केला जात आहे. जे सत्य आहे, ते आम्ही बोलणारच. शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे म्हणाले, देशाचे तारणहार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले, त्या बाळासाहेब ठाकरेंना मी उद्धव ठाकरे यांच्यात पाहतो. आजची तरुण पिढी शिवरायांचे जीवनचरित्र वाचायला तयार नाही. पण ते शिवजयंती साजरी करतात. जयंतीचे रूपही बदलत चालले आहे. शिवरायांचा ध्यास कायमचा धगधगत ठेवणारी जयंती साजरी झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन जयंती साजरी करावी. प्रारंभी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर संभाजीराव भिडे यांच्याहस्ते ठाकरे यांचा तलवार व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आ. नीलम गोऱ्हे, आ. अनिल बाबर, शिरोळचे आ. उल्हास पाटील, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, बाळासाहेब बेडगे, सेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) आता तशी स्थिती नाही!शिवरायांनी स्वराज्यावर आक्रमण करून आलेल्यांना सोडले नाही. पण मित्रांना त्यांनी कधीही दगा दिला नाही. शिवरायांनी स्वराज्यातील जनतेला आपले मानले. जनताही त्यांच्यामागे राहिली. त्यामुळे शिवशाही सरकार आपलेसे वाटायचे. तशी आता स्थिती नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. शिवजयंतीपुरता भगवा नको!ठाकरे म्हणाले, शिवरायांच्या पराक्रमांचा साक्षीदार असलेल्या पश्चिम महाराष्ट्राने सेनेला कधीही एकहाती सत्ता दिली नाही. भगव्यापासून आपण लांब निघालोय. केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरता हाती भगवा घेऊ नका. देशात आणि राज्यात सेनेची एकहाती सत्ता आणण्यासाठी शपथ घ्या. तुम्हाला अपेक्षित असा हिंदुस्थान निर्माण केला जाईल.आओ... जाओ घर तुम्हारा!ठाकरे म्हणाले, पाच ते सात कोटी बांगलादेशी लोक आपल्या देशात राहत असल्याची मला माहिती मिळाली आहे. पण आपले सैनिक तिकडे गेले, तर त्यांचे डोळे काढण्याची शिक्षा दिली जाते. अन्य देशातही घुसखोरांना विविध प्रकारची शिक्षा दिली जाते. आपल्या देशात मात्र तसे नाही. घुसखोरांना रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र आणि निवडणुकीत उमेदवारीही दिली जाते. मंगलकलशअखंड महाराष्ट्र राहावा हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. यासाठी सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने अखंड महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे यांना मंगलकलश देण्यात आला.
राज्यातील सरकार आपलेसे वाटत नाही
By admin | Published: May 03, 2016 12:00 AM