अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात पहिल्या टप्प्यातील २९ ग्रामपंचायतींची रणधुमाळी पुढील महिन्यात उडणार आहे. २९ ग्रामपंचायतींच्या २९१ जागांसाठी निवडणूक होणार असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितराव घोरपडे गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.तालुक्यात पक्षीय राजकारणाची भेळमिसळ झाली आहे. राजकीय सत्ता आणि खुर्चीसाठी सोयीस्करपणे राजकीय साट्यालोट्याचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे गटा-तटामध्ये या निवडणुका होतील.
पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील राजकीय परिस्थिती वेगळी होती. आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढल्या गेल्या होत्या. यामध्ये अजितराव घोरपडे गटाविरोधात आबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, असा संघर्ष झाला होता. यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली होती.सध्या तालुक्यातील राजकीय परिस्थिती सैरभैर आहे. गटा-तटाच्या राजकारणात पक्षीय राजकारण विभागले गेले आहे. पं. स., जि. प. निवडणुकीत एकत्र लढणारे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वत:च्या गटाच्या अस्तित्वासाठी आणि प्रतिष्ठेसाठी उतरतील. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष बघायला मिळेल.
पाच वर्षापूर्वी मजबूत असणारा राष्ट्रवादी पक्ष तालुक्यात बिकट अवस्थेत आहे. गटा-तटाच्या अंतर्गत संघर्षाने पोखरले आहे. राष्ट्रवादीमध्ये आबा गट आणि सगरे गट या निवडणुकीत एकत्रित लढतील, याची शाश्वती नाही. आबा गट व सगरे गट स्वत:चा गट मजबूत करण्याच्यादृष्टीने या निवडणुकीत सोयीस्कर राजकारण करणार, हे निश्चित आहे.तसेच माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचा गट तालुक्यात पं. स., जि. प. निवडणुकीपासून बळकट झाला आहे. आगामी राजकारणाच्यादृष्टीने अजितराव घोरपडे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार, हे स्पष्ट आहे.खा. संजयकाका पाटील यांना कवठेमहांकाळ तालुक्यात राजकीय पाय मजबूत रोवण्यासाठी नामी संधी आली आहे. त्यामुळे ते या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरणार हे निश्चित आहे.
तसेच तालुक्यात राष्ट्रवादी पक्षही तुल्यबळ आहे. परंतु गटा-तटाच्या राजकारणात तो विभागला गेला आहे. राष्ट्रवादीमध्ये आर. आर. पाटील गट व विजय सगरे गट अशी अवस्था आहे. वरून जरी हे दोन्ही गट एकत्र असल्याचा दावा करीत असले तरी, येणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हा संघर्ष गटाच्या अस्तित्वासाठी उफाळून येणार, हे निश्चित आहे.या निवडणुकीमध्ये सरपंच निवड ही थेट जनतेमधून केली जाणार असल्याने, निवडणुकीत प्रचंड चुरस व साट्यालोट्याचे राजकारण होणार आहे. गावा-गावातील विविध पक्षांच्या राजकीय पुढाºयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.गावा-गावातील तरुण मतदार व युवा वर्ग हा ज्यांच्या बाजूला जाईल, तिकडे निवडणुकीच्या निकालाचा कौल जाणार, हे निश्चित आहे. कारण मोठ्या संख्येने तरुणांनी मतदार नोंदणी केली आहे. महाविद्यालयामधूनही मतदार नोंदणी झाल्याने या निवडणुकीत युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावेल. त्यांचे मतदान खेचणे, हे सर्वांपुढे एक आव्हान असणार आहे.या निवडणुका जरी ग्रामपंचायतीच्या असल्या तरी, आगामी विधानसभेची ती नांदी ठरणार आहे. त्यामुळे खा. संजयकाका पाटील, आ. सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या बेरजेच्या आणि वजाबाकीच्या समीकरणांच्या या निवडणुका असणार आहेत, हे राजकीय सत्य आहे. या निवडणुकाकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.अनेक गावांमध्ये टोकाचा संघर्षतालुक्यात काँग्रेस पक्षाची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या २९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी त्यांना उमेदवार मिळणेही कठीण आहे. वाघोली वगळता अन्य गावांमध्ये त्यांना पूर्ण उमेदवार मिळणार नाहीत.रांजणी, आगळगाव, हिंगणगाव, बोरगाव, शिरढोण, जाखापूर, घाटनांद्रे, कुकटोळी, कुची, नागज, आरेवाडी, मळणगाव, खरशिंग ही तालुक्यातील मोठी गावे असून, या गावांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष होणार आहे.ग्रामपंचायत सदस्यखरशिंग ११हिंगणगाव १३शिंदेवाडी ९कोंगनोळी १३विठुरायाचीवाडी ११लांडगेवाडी ९आरेवाडी ९अलकूड (एम) ७नागज १३शिरढोण ९सराटी ७मळणगाव ११केरेवाडी ७आगळगाव ११लंगरपेठ ९रांजणी १५चुडेखिंडी ७लोणारवाडी ९घाटनांद्रे ९वाघोली ७कुची १३जाखापूर ९हरोली ९बोरगाव ११कुकटोळी ११जायगव्हाण ७शेळकेवाडी ७अलकूड (एस) ९ढालेवाडी ९