सांगली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्याकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी सांगलीत भाजपच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲड.स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाना पटोले यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी स्वाती शिंदे म्हणाल्या की, नाना पटोले यांनी केलेली कृती निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष कसा घराणेशाही, गुलामगिरीला बळ देत असतो, याची प्रचिती पटोले यांच्या कृतीतून आली आहे. कार्यकर्त्यांना गुलामासारखी वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करीत आहोत. आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, अश्विनी तारळेकर, मनीषा शिंदे, विद्या दानोळे, छाया जाधव, लीना सावर्डेकर आदी सहभागी झाले होते.
सांगलीत नाना पटोले यांचा भाजपतर्फे निषेध
By अविनाश कोळी | Published: June 19, 2024 6:05 PM