सांगली : उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे. मात्र, आता कोरोनाचे संकट अटोक्यात आल्यानंतर लवकरच प्रस्तावित असलेल्या आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.गृहमंत्री देशमुख म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण जगभरात संकट निर्माण झाले असताना, त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याअगोदरच राज्यात आठ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया विचारात होती. मात्र, आता कोरोनाचे संकट अटोक्यात आल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.कोरोनामुळे जीव गमाविलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ६५ लाखांपर्यंतची मदत करण्यात येत आहे. शिवाय आता नवीन निर्णयानुसार त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत त्यांना शासकीय निवासस्थानात राहता येणार आहे.
पोलीस दलातील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जोखमीचा बंदोबस्त देण्यात येऊ नये, याबाबतच्याही सूचना दिल्या आहेत. पोलीस दलातील प्रत्येक घटकाची कोरोना कालावधित काळजी घेण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.