सांगली : गायीच्या दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी आज दि. २८ जूनपासून रस्त्यावर उतरत आहेत. उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्तारोको, उपोषणे, निदर्शने करावीत, असे आवाहन किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केले आहे. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. १ जुलै रोजी निदर्शने करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.उमेश देशमुख म्हणाले, दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. २८ जूनपासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू होत आहे. किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.गेले वर्षभर दूध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रति लीटर १० ते १५ रुपयांचा तोटा शेतकरी सहन करत आहे. दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ४० रुपये दर द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे, वाढता उत्पादन खर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लीटर १० रुपये करावे, या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.
दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करादूध दराचा प्रश्न सोडविण्यासाठी दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा, यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशू औषधांचे दर नियंत्रित करावेत, खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा, दूध भेसळ रोखावी, आदी मागण्याही संघर्ष समितीने केल्या आहेत, असेही उमेश देशमुख म्हणाले.