दिलीप मोहिते विटा (जि.सांगली) : येथील भाजीपाला विक्रेते कमरूद्दीन व त्यांची पत्नी हसीना पानवाले यांचा मुलगा सलीम याने युपीएससीच्या भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षेत यशाचा झेंडा फडकविला असून, त्याने देशात २० वा, तर महाराष्टात अव्वल येण्याचा मान पटकाविला आहे. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
भारतीय सांख्यिकी अधिकारी म्हणून निवड झालेला सलीम हा महाराष्टातील एकमेव आहे. गरिबीचे चटके सोसत, कष्टाच्या वाटेवरून चालत सलीमने यशोशिखर गाठत केवळ आई-वडिलांचेच नव्हे तर विट्याचे नावही देशस्तरावर कोरले. नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात आलेल्या घरकुल आवासात पानवाले कुटुंब वास्तव्यास आहे. कमरूद्दीन, पत्नी हसीना यांचा मुलगा सलीम, अलीम व मुलगी हिनाकौसर असा पाच सदस्यांचा हा परिवार. सलीम हा त्यांचा मोठा मुलगा. दुसरा मुलगा अलीम स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मुलगी हिनाकौसर एम. कॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. आई व वडील दोघेही अशिक्षित, परंतु मुलांनी शिकावे, मोठे व्हावे, हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आणि त्यासाठी प्रचंड कष्ट उपसले.
सलीमने विटा नगरपरिषदेच्या उर्दू शाळेत प्राथमिक, तर येथीलच राहमत अॅँग्लो उर्दू विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.सलीमने कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्रातून एम. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याने विटा येथील बळवंत महाविद्यालयात दीड महिना प्राध्यापक म्हणून काम केले होते.आई-वडिलांनी आम्हा मुलांसाठी खूप कष्ट केले. त्याची जाणीव होती. त्यामुळे मी सुद्धा खूप अभ्यास केला. त्याला यश मिळाले. निकाल ऐकल्यानंतर डोळ्यात आनंदाश्रू होते. देशासाठी, लोकांसाठी चांगले काम करण्याचे स्वप्न आहे. पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न राहील. - सलीम पानवाले, सांख्यिकी अधिकारीपहिल्याच प्रयत्नात यशसलीमने दररोज पाच ते सहा तास अभ्यास केला. जूनमध्ये सांख्यिकी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. यात सहापैकी चार पेपर हे संख्याशास्त्रावर आधारित होते, तर इंग्रजी व जनरल स्टडीज् असे अन्य दोन विषय होते.