मिरज : मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर यांनी तयार केलेला महात्मा बसवेश्वरांच्या अर्धपुतळ्याचे शनिवारी लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अनावरण झाले. गुजर यांनी साकारलेले पुतळे अमेरिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड या देशात स्थापन झाले आहेत. ब्राँझचे पुतळे तयार करण्यात विजय गुजर यांची ख्याती आहे. गुजर यांनी देशात व परदेशातील अनेक थोर पुरुषांचे ब्राँझचे पुतळे तयार केले आहेत. गुजर यांनी साकारलेला राणी चेन्नम्मा यांचा पुतळा कर्नाटक शासनातर्फे दिल्लीत संसद भवनाच्या आवारात बसविण्यात आला आहे. सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे बसविण्यात आलेला राजमाता जिजाऊ, महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्नाटकातील टुमकूर येथील सिध्दगंगा स्वामी यांसह शेकडो विविध पुतळे गुजर यांनी तयार केले आहेत. स्वित्झर्लंडमधील फुटबॉलपटू जॉन व्होगल, अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील राणी चेन्नम्मा, इंग्लंडमधील चार्ली चॅप्लिन आदी पुतळे साकारले आहेत. इंग्लंडमधील अनिवासी भारतीय उद्योजक धीरज पाटील यांनी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा तयार करण्याचे काम गुजर यांच्याकडे सोपविले होते. गुजर यांनी तयार केलेला महात्मा बसवेश्वरांचा तीन फूट उंचीचा बाँझचा अर्धपुतळा सहा महिन्यांपूर्वी जहाजातून लंडनला पाठविण्यात आला. इंग्लंडमधील थंड हवामानासाठी पुतळ्याला रंग देण्याऐवजी आॅक्सिडायझेशन प्रक्रिया करण्यात आली आहे. समतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धपुतळ्याचे लंडन येथील थेम्स नदीकाठी संग्रहालयाच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शनिवारी अनावरण झाले. गेली ५० वर्षे शिल्पकृती साकारणाऱ्या गुजर यांच्या कलेचे परदेशातही कौतुक झाले आहे. कर्नाटकातील प्रमुख शहरांसह संसदेपर्यंत त्यांच्या विविध शिल्पकृती लक्षवेधी ठरल्या आहेत. कर्नाटक शासनातर्फे संसदेच्या आवारात बसविण्यात आलेल्या राणी चेन्नम्मा यांच्या पुतळ्याचे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते अनावरण झाले आहे. कर्नाटकात राणी बेन्नूर, गदग, टुमकूर, धारवाड, खानापूर येथेही त्यांचे पुतळे आहेत. गदग या एकाच शहरात त्यांनी साकारलेले १० अर्धपुतळे, तर धारवाड शहरात चार पुतळे आहेत. (वार्ताहर)
मिरजेत साकारलेला बसवेश्वरांचा पुतळा लंडनमध्ये
By admin | Published: November 15, 2015 1:09 AM