मिरज : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुतळे गोव्यात उभारण्यात येणार असून, मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर ते साकारत आहेत. गोवा शासनातर्फे गोव्यात पर्रीकर यांचा पूर्णाकृती व अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे.शिल्पकार विजय गुजर यांनी पर्रीकर यांचा अर्धपुतळा साकारला असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह गोव्यातील भाजपचे मंत्री व नेते तयार केलेला पुतळा पाहण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर मिरजेला येण्याची शक्यता आहे.
पुतळ्यास मान्यता मिळाल्यानंतर पर्रीकर यांचे ब्राँझचे पुतळे गुजर यांच्या कारखान्यात तयार होणार आहेत. गोव्यात माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्यानंतर मनोहर पर्रीकर यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत.शिल्पकार विजय गुजर यांनी तयार केलेल्या शेकडो शिल्पकृतींनी महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध शहरांच्या सौदर्यात भर घातली आहे. विजय गुजर यांनी साकारलेला राणी चेन्नम्मा यांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक शासनातर्फे संसद भवनात बसविण्यात आला आहे.