सांगली : व्यापारी, व्यावसायिकांसाठी कर्दनकाळ ठरलेला लॉकडाऊन येत्या दोन दिवसांत न उठविल्यास भाजपचे सर्व नेते व्यापारी, व्यावसायिकांसोबत जाऊन बाजारपेठा खुल्या करतील, असा इशारा खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
खासदार पाटील म्हणाले की, तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ बाजारपेठा बंद आहेत. व्यापारी, विविध व्यावसायिक, उद्योजक व अन्य घटक या लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहेत. जगण्या-मरण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. लॉकडाऊन म्हणजे एकप्रकारचा छळ ठरत आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन तातडीने उठवावा. राज्य शासनाला आम्ही त्यासाठी दोन दिवसांची मुदत देत आहोत. त्यांनी निर्णय घेतला नाही, तर व्यापारी, व्यावसायिकांसोबत जाऊन आम्ही बाजारपेठा खुल्या करू. येत्या शुक्रवारी आम्ही हे आंदोलन करणार आहोत. त्यासाठी गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. कृष्णा कारखाना, गोकुळ दूध संघ, सोलापूर येथील निवडणुकांबाबत शासनाने सोयीस्कर भूमिका घेतली. त्यामुळे त्याठिकाणी रुग्णसंख्या वाढली आहे.
आ. गाडगीळ म्हणाले की, प्रशासनाने लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे त्यांच्या नियोजनात कुठेतरी त्रुटी आहे, हे सिद्ध होत आहे. लॉकडाऊन हा एकच पर्याय ठेवून प्रशासन काम करीत आहे. लोकांचे यामुळे काय हाल होत आहेत, याची जाणीव ना राज्य शासनाला आहे, ना प्रशासनाला. त्यामुळे आम्ही व्यापारी व जनतेच्या सोबत राहणार आहोत.
आ. खाडे म्हणाले की, भाजपने आजवर जनतेच्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढेही लॉकडाऊन उठविण्याच्या मागणीसाठी आमची ही भूमिका कायम राहील.
चौकट
शासन, प्रशासन अपयशी
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले की, कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाने, प्रशासनाने कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही. कोरोना नियंत्रणात आणण्यात ते अपयशी ठरले आहेत.
चौकट
अधिकाऱ्यांच्या बदल्या करा
खासदार पाटील म्हणाले की, कोरोना स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने कराव्यात. यासाठी आम्ही शासनाकडे आग्रही भूमिका मांडू.