लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील एका रुग्णालयाकडून इस्लामपूूर-वाळवा रस्त्यावर जैव वैद्यकीय कचरा बेकायदेशीररीत्या टाकला जात आहे. तेथे इतर कचराही टाकल्याने परिसराला त्याचा त्रास होत आहे. शेतकऱ्यांनी पालिकेतील आरोग्य अधिकारी जमीर मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली आहे. संबंधित रुग्णालयावर कारवाई करणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुग्णालयातील वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी जिल्ह्यात वेगळी यंत्रणा आहे. प्रत्येक रुग्णालयाने या कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी या यंत्रणेकडे नोंदणी करण्याची गरज आहे. यासाठी या यंत्रणेकडून वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या दिल्या जातात. या कचऱ्याच्या पिशव्या आठवड्यातून ही यंत्रणा घेऊन जाते; परंतु शहरातील एका डॉक्टरने इस्लामपूर-वाळवा रस्त्यावरील खड्ड्यात त्यांच्या रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा टाकला होता. त्याची दुर्गंधी पसरल्याने या रस्त्यावरील शेतकरी प्रदीप पाटील, राजेंद्र पाटील, संतोष पाटील यांनी इस्लामपूर पालिकेचे आरोग्य अधिकारी जमीर मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली.
या कचऱ्यात इंजेक्शने, मास्क, डॉक्टरने रुग्णाला दिलेली औषधाची चिठ्ठी सापडली. यामुळे या डॉक्टरचा नाव व पत्ता उघड झाला आहे. त्याचा आरोग्य खात्याने पंचनामा केला असून या डॉक्टरवर कारवाई करण्यात येणार आहे.
कोट
इस्लामपूर-वाळवा रस्त्यावर जैव वैद्यकीय कचरा टाकल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये डॉक्टरच्या नावाचा उल्लेख असलेल्या औषधाची चिठ्ठीही सापडली आहे. संबंधित रुग्णालयाला नोटीस देण्यात येणार आहे.
- जमीर मुश्रीफ, आरोग्य अधिकारी, इस्लामपूर नगरपरिषद.