शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथील विद्या मानसिंग धुमाळ (वय ३५) या विवाहितेने आपल्या तीन सावत्र मुलींना पळवून नेल्याची घटना बुधवार, दि. ५ रोजी घडली. याबाबत गुरुवारी शिराळा पोलिसात मानसिंग धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. स्नेहल मानसिंग धुमाळ (वय १६), तृप्ती मानसिंग धुमाळ (१४), श्रेया मानसिंग धुमाळ (११) अशी त्या मुलींची नावे आहेत.मानसिंग यांच्या पहिल्या पत्नीस तीन मुली आहेत. ती मुंबईला गेल्यानंतर त्यांनी या घराशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. दुसरी पत्नीही जास्त दिवस नांदली नाही. मानसिंग यांच्या मावशी इस्लामपूर बसस्थानकाजवळ केळी विक्रीचा व्यापार करतात. त्यांच्याकडे दि. १५ जानेवारी रोजी विद्या नावाची महिला आली व मी एकटीच असल्याने मला कोणाचेही पाठबळ नाही, असे तिने सांगितले.यावेळी मावशी आशाताई कांबळे यांनी, तू माझ्या भाच्याबरोबर लग्न करशील का? असे विचारले. यानंतर दि. १६ जानेवारीला मानसिंग यांचा तिसरा विवाह विद्या हिच्याबरोबर झाला. यावेळी विद्याने मी टाकळी (जि. लातूर) या गावची असल्याचे सांगितले. यानंतर जवळपास अडीच महिने विद्या घरातील सासरे हिंदुराव धुमाळ, सासू यशोदा धुमाळ, पती व तीनही मुलींचा विश्वास संपादन करीत संसार करीत होती. बुधवार, दि. ५ रोजी दुपारी १ वाजता सासरे व सासू शेतात गेले, तर पती मानसिंग हे पेट्रोलपंपावर नोकरीस असल्याने कासेगाव येथे गेले होते. त्यावेळी स्नेहल, तृप्ती, श्रेया या तीनही मुलींना कपडे व साहित्यासह घेऊन विद्या बाहेर पडली.सुरुवातीला मानसिंग, रमेश धुमाळ, विलास धुमाळ यांनी कऱ्हाड, इस्लामपूर आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा कोठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा शिराळा पोलिसांत फिर्यादी देण्यात आली.पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील टाकळीसह विविध गावांमध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र, विद्या नावाची महिला नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
सावत्र आईने तीन मुली पळविल्या
By admin | Published: April 07, 2017 12:11 AM