सांगली : लोकसंख्या नियंत्रणाची अनेक नवनवी आधुनिक व सुलभ तंत्रे आली, पण पुरुषांकडून त्यांना अजिबात प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. २०२० या वर्षात एकूण ३७९९ नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या, त्यामध्ये फक्त एकच पुरुष आहे, उर्वरित सर्व शस्त्रक्रिया स्त्रियांवर झाल्या आहेत. यातून पुरुषांचा नसबंदीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट होतो.
प्रसूतीनंतर ओल्या अंगाने लगेच शस्त्रक्रिया केलेली चांगली, ही मानसिकता स्त्रियांवरच नसबंदीचे ओझे लादत आहे. पुरुष नसबंदीसाठी शासकीय आरोग्य यंत्रणांना उद्दिष्ट दिले जाते, त्यासाठी शिबिरेही घेतली जातात, पण पुरुष पुढे येत नाहीत. शासकीय रुग्णालयात पुरुष नसबंदीच्या कक्षात एखादा पुरुष दाखल झाल्याचे कधीही पाहायला मिळत नाही, असा अनुभव डॉक्टरांनी सांगितला. जणू अपत्यांची संख्या रोखण्याची जबाबदारी फक्त स्त्रीचीच आहे, अशी भावना पुरुषांत आहे.
पुरुषांच्या नसबंदीनंतर अगदी साठ दिवसांपर्यंतही तो प्रजननक्षम राहतो. त्यामुळे पतीच्या नसबंदीनंतरही पत्नी गर्भवती राहिल्याच्या घटना अधुनमधून दिसतात. यातूनच पुरुषाची नसबंदी यशस्वी होत नाही, असा समज प्रचलित झाला आहे. यामुळेही पुरुष पाठ फिरवत असल्याचा अनुभव आहे. खासगी रुग्णालयांत तर पुरुषाच्या नसबंदीची नोंद अत्यंत अपवादात्मक आहे. शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया नाकारणाऱ्या पुरुषांसाठी खासगी रुग्णालयांत सोय झाली, तर प्रमाण काहीअंशी वाढेल, असा आरोग्य यंत्रणेचा सूर आहे.
पॉईंटर्स
२०१९ मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया - ६३०३
स्त्री - ६२९७, पुरुष - ६.
२०२० मध्ये झालेल्या शस्त्रक्रिया - ३७९९
स्त्री - ३७९८, पुरुष - १.
कोट
पत्नीच्या दुसऱ्या प्रसुतीनंतर रुग्णालयातच तिने नसबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे मला करावी लागली नाही.
- राजाराम माळी, मिरज
कोट
नसबंदीसाठी माझी तयारी होती, पण पत्नीने विरोध केला. तिने स्वत:च्या नसबंदीसाठी रुग्णालयात विनंती केली, त्यामुळे माझी होऊ शकली नाही.
- गोविंद डोंगळे, सांगली
चौकट
म्हणे, नसबंदीने नपुंसकत्व येते...
नसबंदीची मोहीम सुरू झाल्यापासूनच त्याविषयी प्रचंड गैरसमज आहेत. नसबंदीने नपुंसकत्व येते हा त्यापैकीच एक. पुरुषांना शेतीसह विविध ओझ्याची कामे करावी लागतात, पण नसबंदीनंतर ती झेपणार नाहीत, असाही गैरसमज आहे. अनेकदा पत्नीच पतीच्या नसबंदीला विरोध करत असल्याचा अनुभव डॉक्टरांनी सांगितला. पतीच्या नसबंदीनंतरही पत्नी गर्भवती राहिल्याचे प्रसंग काहीवेळा घडलेत. त्यामुळे ती यशस्वी होत नाही, असाही समज प्रचलित झाला आहे.
कोट
पुरुष नसबंदीचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात पूर्वीपासूनच कमी आहे. अनेक गैरसमजांमुळे पुरुष पुढे येत नाहीत. महिला मात्र नेहमीच सकारात्मक असल्याचा अनुभव आहे.
- डॉ. विवेक पाटील, माता बालसंगोपन अधिकारी.