इस्लामपूर : बोगस ग्रीन हाऊसच्या माध्यमातून आष्टा येथील शेतकऱ्याला चुकीच्या पद्धतीने अनुदान वाटप केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केल्यानंतर कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी ग्रीन हाऊसचे स्टिंग आॅपरेशन केले. संबंधित शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण हे जयंत पाटील यांचेच समर्थक असल्याचे व जयंत पाटील यांनी त्यांचा वापर करून बोगस आरोप केल्याचे समोर आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.आष्टा (ता. वाळवा) येथील शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण यांनी ८१ लाख ९१ हजारांचे ग्रीन हाऊससाठीचे अनुदान चुकीच्या पध्दतीने घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला होता. याची स्वत: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शहानिशा केली. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार अथवा फसवणूक झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री खोत यांनी संबंधित शेतकरी तानाजी चव्हाण यांचा आष्टा येथे जाऊन सत्कार केला. विशेष म्हणजे चव्हाण हे जयंत पाटील यांचेच कार्यकर्ते असून, वैयक्तिक आकसापोटी चव्हाण यांना अडचणीत आणल्याचा आरोपही खोत यांनी केला.तानाजी चव्हाण म्हणाले, आम्ही घेतलेल्या अनुदानासाठी प्रत्येक सात-बारा वेगळा आहे. शासनाच्या धोरणानुसार आम्हाला माझ्या नावावर २०१३-१४ मध्ये ४० गुंठ्यासाठी ३ लाख ६० हजार, शांताबाई आनंदराव चव्हाण यांना १५ गुंठ्यासाठी १ लाख ९० हजार, तसेच भगतसिंग यांच्या ४० गुंठ्यासाठी ३ लाख २४ हजारांचे, असे अनुदान घेतले आहे. यापूर्वी मला शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. या ग्रीन हाऊसमुळे परिसरातील शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे. असे असताना माझी बदनामी कशासाठी? सध्या मी जिल्हा शेती कमिटीवर नियुक्त आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे मी जिल्हाधिकाºयांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे.यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, वैभव शिंदे, प्रवीण माने, बाळासाहेब थोटे, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, कृषी अधीक्षक उमेश पाटील, तालुका कृषी अधिकारी भगवान माने उपस्थित होते.काय आहे प्रकरणमंत्री खोत म्हणाले, २७ मार्च रोजी जयंत पाटील यांनी विधानसभेतील चर्चेत आष्टा येथील शेतकरी तानाजी आनंदराव चव्हाण, शांताबाई आनंदराव चव्हाण, भगतसिंग चव्हाण अशा एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावे ८१ लाख ९१ हजार इतके अनुदान बोगसरित्या घेतल्याचा आरोप केला होता. तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रीन हाऊस त्याठिकाणी नसल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यावेळी मी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. रविवारी १ एप्रिल रोजी चव्हाण यांच्या ग्रीन हाऊसला भेट देऊन संबंधित शेतकºयांची भेट घेतली. मिळालेले अनुदान आणि त्याचा वापर योग्यप्रकारे झाला का, याची खात्री केली असता, यामध्ये शासनाची कसलीही फसवणूक झाली नसल्याचे समोर आले. केवळ माझ्याविरोधात राजकीय सूडबुध्दीनेच आ. पाटील यांनी हे आरोप केल्याचे निष्पन्न झाले.
सदाभाऊंकडून जयंतरावांच्या आरोपाचे ‘स्टिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:15 PM