सांगली : बाल्कनीत बसून स्वयंपाक खोलीच्या दरवाजाचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न करणाºया चोरट्याला कुटुंबाचे प्रसंगावधान व विश्रामबाग पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने पकडण्यात यश आले. बच्चीराम नंदराम (वय ३२, रा. क्वैराली, उत्तराखंड) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्धच चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
शंभरफुटी रस्त्यावरील शिवसावली अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक नऊमध्ये मेघा निवास काटकर या मुलासोबत राहतात. बुधवारी रात्री अकरा वाजता त्या जेवण करुन झोपी गेल्या. गुरुवारी पहाटे चार वाजता त्यांना घरातील स्वयंपाक खोलीची खिडकीची काच फुटल्यासारखा आवाज आला. त्यामुळे मेघा काटकर यांनी त्यांच्या मुलास उठवून हा प्रकार आला. मुलाने उठवून घरात फिरुन कानोसा घेतला. त्यावेळी स्वयंपाक खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत बसून कोणी तरी दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आवाज आला. मेघा काटकर यांनी शेजारील फ्लॅटमध्ये राहणारे प्रकाश निंबाळकर व रिझवान मौलवी यांना उठूवन हा प्रकार सांगितला. निंबाळकर यांनी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कळविण्यास सांगितले.
मेघा काटकर यांनी मुख्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधला. पण दूरध्वनी बराचवेळ व्यस्त लागून राहिला. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस पाच मिनिटात काटकर यांच्या फ्लॅटमध्ये दाखल झाले. स्वयंपाक खोलीचा दरवाजा उघडून पोलीस बाल्कनीत गेले. त्यावेळी बच्चीराम नंदराम हा सापडला. पोलिसांनी त्याला तिथेच थोडा ‘प्रसाद’ दिला. त्यानंतर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी केली. त्याने चोरीसाठी काटकर यांच्या घरात घुसल्याची कबुली दिली.
याप्रकरणी मेघा काटकर यांची फिर्याद घेऊन नंदराम याच्याविरुद्ध चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. तो सांगलीत कसा आला? त्याचे साथीदार कोण आहेत का? त्याच्याविरुद्ध उत्तराखंडमध्ये गुन्हे दाखल आहेत का? याबद्दल चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या महिन्याभरात सांगली, मिरज शहरात चोरीचे प्रकार मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पाऊणतास बाल्कनीतचमेघा काटकर यांना आवाजामुळे जाग आली. घरात कोणीतरी शिरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी व त्यांच्या मुलाने कोणताही आवाज न करता शांतपणे या चोरट्याला पकडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले. विश्रामबाग पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने बच्चीराम नंदराम हाती लागला. काटकर यांनी शेजाºयांना तसेच पोलिसांना कळवूपर्यंत पाऊणतास होऊन गेला होता. तोपर्यंत नंदराम अजूनही कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत होता.