सांगली : भिलवडी (ता. पलूस) आणि नांद्रे (ता. मिरज) येथील लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुकीचा प्रकार घडला आहे. लस टंचाईस आरोग्य कर्मचारी जबाबदार नसतानाही त्यांच्यावर लसीकरण केंद्रावर हात उचलला जात असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. यावर त्वरित तोडगा काढावा, अन्यथा काम बंद करावे लागेल, असा इशारा आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी शुक्रवारी दिला.
ते म्हणाले की, राज्य शासनाकडूनच पुरेशी लस मिळत नाही तर आरोग्य कर्मचारी केंद्रावर कसे उपलब्ध करणार आहेत? लस संपल्यानंतर ग्रामस्थ कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलत आहेत. भिलवडी, नांद्रे लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. लस नसेल तर कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. यापुढे हल्ले सहन करणार नाही. लस टंचाईच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तोडगा काढावा. ऑनलाईन नोंदणीमुळे अन्य गावांतील लोकही नोंदणी करुन लसीसाठी येत आहेत. यामुळे गावातील लोक लसीकरणापासून वंचित राहात असल्यामुळे हा उद्रेक होत आहे. पुरेशा प्रमाणात लस येऊपर्यंत आरोग्य कर्मचारी लसीकरण थांबवतील.
चौकट
ग्रामदक्षता समितीतर्फे नोंदणी करा
गर्दी कमी करण्यासाठी ग्रामदक्षता समितीतर्फे नोंदणी करण्याची गरज आहे. त्यानंतर शासनाकडून जेवढी लस मिळेल, तेवढ्याच कुपनचे ग्रामपंचायतीने वाटप करावे. तेवढ्याच लोकांना लसीकरण केंद्रावर सोडण्यात यावे, असेही दत्तात्रय पाटील म्हणाले.